Pimpri News: ‘सुलक्षणा शिलवंत यांच्याविरोधातील तक्रारीविरोधात आठ आठवड्यांमध्ये निर्णय घ्या’ – उच्च न्यायालय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्या विरोधातील तक्रारीबाबत 6 ऑगस्टपासून पुढील आठ आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती ए.ए. सय्यद आणि एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने दिला आहे.

याबाबतची माहिती माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुलक्षणा शिलवंत या नगरसेविका झाल्या होत्या. सध्या त्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही कार्यरत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने शहरातील नागरिकांना मोफत मास्क पुरविण्यासाठी दहा लाख मास्कची खरेदी केली होती.

कोरोनाच्या संधीचा फायदा उठवित आर्थिक फायद्यासाठी सुलक्षणा शिलवंत यांनी पदाचा गैरवापर करून पतीच्या व भावाच्या नावे असलेल्या कंपनीच्या नावे महापालिकेला 1 लाख मास्क पुरविले होते. तसेच त्यापोटी दहा लाखांची रक्कमही महापालिकेकडून प्राप्त केली होती. लोकप्रतिनिधी (नगरसेवक) म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या फायद्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होत येत नाही. नगरसेवकाने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्यास महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार नगरसेवकपदावर राहण्यास अपात्र ठरते. कायद्यातील या तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत या अपात्र ठरत असल्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सुलक्षणा शिलवंत यांच्या पती व भावाच्या नावे असलेल्या कंपनीने महापालिकेला एक लाख मास्क पुरविल्याचे तसेच त्यापोटी महापालिकेकडून दहा लाख रुपये घेतल्याचे पुरावे त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सादर केले. यावर न्यायमुर्ती ए.ए. सय्यद यांनी विभागीय आयुक्तांच्या वकीलांना या प्रकरणात तथ्य आढळून येत असतानाही अद्यापपर्यंत निर्णय का झाला नाही? याबाबत विचारणा केली. यावर विभागीय आयुक्तांच्या वकीलांनी काही अवधी देण्याची न्यायालयाला विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील आठ आठवड्यात योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले.

वैफल्यग्रस्त होऊन पत्रकार परिषद – शिलवंत
” जितेंद्र ननावरे यांनी वैफल्यग्रस्त होऊन पत्रकार परिषद घेतली. ते प्रसार माध्यमांची दिशाभूल करत आहेत. विभागीय आयुक्तांनी यापूर्वीच त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढला आहे. त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, अशी प्रतिक्रिया नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.