Talegaon Dabhade News : प्रा. बाळसराफ यांच्या विरोधात आदर्श विद्या मंदिरसमोर निदर्शने

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित आदर्श विद्या मंदिर या संस्थेच्या संचालक मंडळावरून माजी प्रचार्य दत्तात्रय बाळसराफ यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) आदर्श विद्या मंदिर संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते अभय देवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आदर्श विद्या मंदिरचे संचालक वसंत पवार आणि आमदार सुनील शेळके यांचे भाऊ सुधाकर शेळके यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

आंदोलनाच्या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदर्श विद्या मंदिर संस्थेच्या संचालक मंडळावर प्रा. दत्तात्रय बाळसराफ कार्यरत आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा डागाळलेली आहे. प्रा. बाळसराफ यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना संस्थेच्या कुठल्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

प्रा. बाळसराफ यांची संचालक मंडळातून हकालपट्टी करावी. त्यानंतर संस्थेची पंचवार्षिक निवडणूक घ्यावी. संस्थेत काम करणारे महिला शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी यांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात काम केले पाहिजे. तसेच फी भरता न आल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेऊ नये, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या संदर्भातील सर्व आरोप प्रा. दत्तात्रय बाळसराफ यांनी फेटाळून लावले. आदर्श विद्या मंदिर संस्थेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसलेल्या लोकांनी विशिष्ट हेतूने हे आंदोलन केले आहे. संस्थेच्या सर्व सभासदांना आपले योगदान माहीत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दबावतंत्रांचा काहीही उपयोग होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.