Pimpri News: शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करा – शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचाही समावेश आहे. यामुळे महापालिकेचे नाव बदनाम झाले आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी करत त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

याबाबत शिवसेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात को-हाळे यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींमध्ये शिंदे यांचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्जही फेटाळला आहे.

ज्योत्स्ना शिंदे यांनी हा घोटाळा करुन महापालिकेचे नाव खराब केले आहे. त्यांनी पदाचा गैरवापर करुन हे कृत्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या सर्व महत्वाच्या निर्णयांचा फेरविचार करावा; अथवा ते रद्द करावे. या प्रकरणावरुन त्यांच्या विषयी भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा तयार झाली असून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. त्यांना निलंबित करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी को-हाळे यांनी केली आहे.

निवेदनावर शहर संघटक संतोष सौंदणकर यांचीही स्वाक्षरी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.