Maratha reservation News: केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख राम जाधव यांची माहिती

एमपीसी न्यूज – केंद्रीय आरक्षणात मराठा समाजाचा समावेश व्हावा, म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करावी तसेच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याबाबतच्या लोकसभा, राज्यसभा पटलावर असलेल्या बिलाला मंजुरी द्यावी, यासाठी लोकसभा अधिवेशन काळात मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे.

लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजे 5 एप्रिल रोजी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. त्यावेळी लोकसभेवर मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की घटनेतील तरतुदीमधील परिच्छेद 340 नुसार आयोगाची नियुक्ती न्यायमूर्ती एम. जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. आयोगाने घटनेतील 15 (4) आणि 16(4) मधील तरतुदीनुसार सामाजिक मागास व शैक्षणिक मागास प्रवर्ग जाहीर केला. अशा या घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा. समस्त महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.

सर्वोच्च न्यायालयात अडकलेले सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्गातील आरक्षण मार्गी लागावे, त्यावरील स्थगिती उठवी या साठी सबळ पुरावे सादर करून विधिज्ज्ञ सक्षमपणे मांडणार आहेत; परंतु असे असले तरी केंद्रीय आरक्षणाची मर्यादा वाढवावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीवर धडक देणार आहे.

केंद्रीय स्तरावर मराठा समाजाचा समावेश करीत एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवावी, या मागण्यांसाठी आता दिल्लीला होणाऱ्या अधिवेशनावर धडक देणार आहोत, असेही जाधव यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.