Pimpri News: आरोग्यसेवेसाठी महापालिका उभारणार ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक आरोग्यसेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ उभारणार आहे. महापालिका आणि ‘यूएनडीपी’ने भारताच्या पहिल्या ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ची आखणी व अंमलबजावणी यावर चर्चा सुरु केली असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

यूएनडीपी, संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था असून आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे यांचे महत्वाचे कार्यक्षेत्र आहे.

पिंपरी महापालिका भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. काही रुग्णालयांना असंसर्गजन्य रोगांकरिता विशिष्ट उपचार केंद्रांमध्ये (एनसीडी) रुपांतरित करण्याची योजना आखत आहे.

नागरिकांना उपलब्ध होणा-या आरोग्य सेवांच्या सुधारित स्तरासाठी पायाभूत सुविधा सुधारणे, आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेची क्षमता वाढविणे यासाठी यंत्रणेची स्थापना, प्रक्रिया आणि प्रोटोकॉलचे मानांकीकरण यासाठी महापालिका गुंतवणूक करणार आहे.

सार्वजनिक आरोग्यसेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ हा दृष्टीकोन विचारात घेण्यात येत आहे. हा एक परिणाम आधारित वित्तपुरवठा आणि अंमलबजावणीचा दृष्टीकोन आहे.

जेथे गुंतवणूकदारांना योग्य तो निकाल मिळाल्यानंतर मोबदला दिला जातो. गुंतवणुकीचे हे मॉडेल नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि अनुकूलन व्यवस्थापनास सक्षम करते. जिथे प्रणालीगत बदलासाठी परस्पर जोडलेला हस्तक्षेप आवश्यक आहे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.