Pimpri News: स्वनिधी योजनेतून फेरीवाले आत्मनिर्भर !

एमपीसी न्यूज – केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना पिंपरी-चिंचवड (Pimpri News) महापालिकेमार्फत राबविण्यात येत असून, या योजनेसाठी 2020 पासून 15 हजार 147 फेरीवाल्यांनी पालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 9 हजार 754 जणांचे अर्ज मंजूर झाले असून 7 हजार 362 फेरीवाल्यांनी स्वनिधीचा लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. तर 3 हजार 593 अर्ज विविध बॅंकांकडे अर्ज प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. आत्तापर्यंत 12 हजार पेक्षा जास्त फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. यामुळे शहरात फेरीवाले किती याची माहिती मिळणार आहे. फेरीवाल्यांना केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या स्वनिधी योजनेमध्ये बॅंकेद्वारे प्रथम कर्ज दहा हजार, प्रथम कर्जाचे परतफेड केल्यानंतर वीस हजार रूपये, द्वितीय कर्ज रक्कमेच्या परतफेडीनंतर पन्नास हजार रूपये कर्जाची रक्कम देण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी कर्ज रकमेची विहीत मुदतीत परतफेड केल्यास कर्ज रकमेच्या व्याजावर 7 टक्के अनुदान मिळते.

शहरातील 15 हजार 147 फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 9 हजार 754 जणांचे अर्ज (Pimpri News) मंजूर झाले असून 7 हजार 362 फेरीवाल्यांनी स्वनिधीचा लाभ घेतला आहे. यापैकी 7 हजार 51 जणांनी प्रथम कर्ज म्हणून 10 हजार रूपये, प्रथम कर्जाची परतफेड केल्यानंतर 2 हजार 698 जणांना 20 हजार रूपये तर द्वितीय कर्ज रक्कमेच्या परतफेडीनंतर 5 जणांना पन्नास हजार रूपयांचे कर्ज मिळाले आहे. तसेच 3 हजार 593 जणांचे अर्ज बॅकेकडे अर्ज प्रलंबित आहेत. 1800 फेरीवाल्यांनी अर्ज करून नंतर प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे विविध बॅंकांनी महापालिकेकडे अर्ज परत केले आहेत.

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू

फेरीवाल्यांना पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे स्वतः विविध बॅंकांच्या प्रतिनिधीशी बैठका घेत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना त्वरीत या योजनेला लाभ मिळण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वनिधीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शहरातील पथविक्रेत्यांनी आधारकार्ड, बॅंक पासबुक, मतदानकार्ड, लाईटबिल इत्यादी सर्व कागदपत्रांसह केंद्रावर जाऊन, योजनेचा अर्ज करावा. ज्या पथविक्रेत्याचे ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, त्यांनी अर्जमध्ये नमूद केलेल्या संबंधित बॅंकेच्या शाखेमार्फत अर्ज मंजूरी व कर्ज वितरणाची कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधित बॅंकेत उपस्थित राहून, त्याचा लाभ घ्यावा. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये व काही भाजीमंडई नजीक केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. जास्तीत-जास्त पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.