Pimpri news: सत्ता दिलेल्या पिंपरी- चिंचवडकरांच्या जीवासाठी तरी खर्च करण्याची दानत ठेवा – राजू मिसाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. पण, संकटाच्या काळात सत्ताधारी भाजप शहरवासियांना विसरत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी किमान ज्यांनी सत्ता दिली त्या पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवासाठी तरी खर्च करण्याची दानत ठेवावी, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी लगविला आहे. आपल्या अपयशाचे खापर राज्य सरकारवर फोडू नये, असेही त्यांनी सुनावले.

मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये तो वेगाने वाढू लागला. मनपा रुग्णालय व शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते. शहरातील कोरोना बाधितांची संख्या इपाट्याने वाढत होती. कोरोनाची परीस्थिती पालिका प्रशासनाच्या हाताबाहेर गेली होती.

पिंपरी-चिंचवड शहराबाबत पालकमंत्री अजितदादांचे प्रेम आहे. आम्ही स्थानिक नेत्यांनी शहरातील कोरोनाबाबतची वस्तुस्थिती सांगितली तेव्हा पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने नेहरु नगर येथे जम्बो रुग्णालयाची उभारणी विक्रमी वेळेत पूर्ण करुन तिथे शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर उपचार चालू केले. सध्याही उपचार चालू आहेत.

राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असताना सुध्दा या रुग्णालयास तातडीन निधी उपलब्ध करुन दिला आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कर्मचा-यांच्या वेतनास विलंब झाला असावा. पालकमंत्री लवकरच याची दखल घेतील व सर्वकाही सुरळीत मार्गी लागेल. याउलट महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आहे. त्यांची कोंडी व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून मदत तर दूर राहोच परंतु राज्याचा हक्काचा असणारा निधी अद्याप दिला नाही.

पिंपरी महापालिका श्रीमंत पालिका आहे. आपल्याच शहरातील नागरिकांसाठी जम्बो कोविड सेंटर असल्याने, पालिकेकडे या जम्बो कोवाड सेंटरचे नियोजन आहे. त्यामुळे पालिकेची देखील जबाबदारी आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ही जबाबदारी झटकू नये. महापालिकेला भिक लागलेली नाही, श्रीमंत महापालिका आहे आणि आयुक्तांनीच तसा विकास कामांसाठी आर्थिक सक्षम असल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाला सुद्धा दिला आहे..

भाजप स्वतःच्या अपयशाचे खापर महाराष्ट्र शासनवर फोडत आहे. आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाठी व त्यासाठी तुमच्या नेत्यांकडे व तुमच्याकडे वेळ आहे. शहरातील कोरोना बाबतीत नियोजन करण्यासाठी वेळ नाही थोडा हे शहराचे दुर्दैव आहे. शहरातील रूग्णांसाठी व उपचारांसाठी काय नियोजन असावे यासाठीचे नियोजन कशा पद्धतीचे असावे याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जून महिन्यात देण्यात आले.

त्यामध्ये आमच्या वतीने शहरात सर्व प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी तयारीसुद्धा दाखविली. परंतु, महापालिकेचा पैसा हा भाजपचा पैसा आहे असा आविर्भाव असल्याने नागरिकांचा जीव हा कमी किमंतीचा वाटला व त्यासाठी शासनाने खर्च दिला नाही म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून इतरांना नावे ठेवणे स्वतःला सुसंस्कृत म्हणणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शोभत नाही, असा टोलाही मिसळ यांनी पत्रकात लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.