Pimpri : अधिकारी, ठेकेदार संगनमताने महापालिका लुटताहेत; भाजप नगरसेवकांचा महासभेत आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनागोंदीपणे कारभार चालला आहे. गेल्या तीन महिन्यापासून जादा दराने निविदा निघत आहेत. तेच-तेच ठेकेदार येत आहेत. प्रशासन ठेकेदारांच्या सोबत आहे. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून महापालिका लुटत आहेत. कितीही लुटले तरी कोणाला समजत नाही, असे प्रशासनाला वाटत आहे. हे सर्व समजत असून आम्हाला कोणत्याही ‘पापात’ सहभागी व्हायचे नाही, असा हल्लाबोल सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी महासभेत केला. नगरसेवकांच्या विरोधानंतर शहरात एलडी दिवे बसविण्याचा विषय फेटाळण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब महासभा आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.विषयपत्रिकेवर शहरात एलडी दिवे बसविण्याचा विषय होता. त्याला सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वपक्षिय नगरसेवकांनी विरोध केला.

शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे म्हणाले, हा विषय चुकीच्या पद्धतीने आणला आहे. त्याला आमचा विरोध आहे. भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, हा विषय महासभेसमोर येणे अपेक्षित नव्हता. शहरात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच ईईएसएल कंपनीकडून एलडी खरेदी करणे बंधनकारक नाही. यामध्ये सर्व नगरसेवकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली घोडेकर म्हणाल्या, शहरात सर्वत्र एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. केवळ 25 ते 30 काम शिल्लक आहे. तरी, देखील सरकारला 77 कोटी रुपये का द्यायचे? त्याचे दर बदलून आणावेत. यामुळे महापालिकेचे 50 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. याचे सत्ताधा-यांनी भान ठेवावे.

‌भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, ईईएसएल कंपनीकडून एलडी खरेदी करणे बंधनकारक नाही. तरीपण त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी अट्टहास कशासाठी केला जात आहे. अधिकारी, ठेकेदार यांच्या संगनमताने महापालिका  लुटण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू आहे. हा कारभार थांबला पाहिजे.

‌तुषार कामठे म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून जादा दराने निविदा निघत आहेत. तेच-तेच ठेकेदार येत आहेत. प्रशासन ठेकेदारांच्या सोबत आहे. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून महापालिका लुटत आहेत. कितीही लुटले तरी कोणाला समजत नाही, असे प्रशासनाला वाटत आहे. परंतु,  हे सर्व समजत असून आम्हाला कोणत्याही ‘पापात’ सहभागी व्हायचे नाही. त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात यावा.

‌माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, एलडी दिवे बसविल्यामुळे 50 कोटीचा तोटा येणार आहे. त्याला सर्व नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे हा विषय फेटाळण्यात यावा.

‌विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, भाजप नगरसेवकांच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडत आहे. पालिकेत किती भ्रष्टाचार चालला आहे. लूटमार होत आहे, हे भाजप नगरसेवकांच्या लक्षात येत आहे. चुकीचे विषय आणून महापालिकेची लूट केली जात आहे. ईईएसएल कंपनीकडूनच एलईडी दिवे घेण्याचा आग्रह कशासाठी केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‌सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, भाजप नगरसेवकांनी आपले मत व्यक्त केल्यास विरोधकांना उखळ्या फुटत आहेत. आम्ही पारदर्शी कारभार करत आहोत. निविदा प्रक्रिया करून एलईडी दिवे घेण्यात येतील. हा विषय फेटाळण्यात यावा.

‌महापौर राहुल जाधव यांनी हा विषय फेटाळल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.