Pimpri : जाधव घाटाजवळील स्मशानभूमीला प्राधिकरणातील नागरिकांचा विरोध

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक 32 अ मध्ये जाधव घाटाजवळ गॅसवर आधारित स्मशानभूमी विकसित होत आहे. मात्र या स्मशानभूमीचे काम रद्द करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

याबाबत प्राधिकरण कार्यालयाचे उपसंचालक एम. वाय. देवडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  सदरील आरक्षित जागेवर कोणतीही स्मशानभूमी नियोजित नव्हती व तसे जुन्या डीपी प्लॅनमध्ये सुद्धा दर्शविण्यात आलेले नाही. याबाबतच्या  माहितीचा कोणताही फलक डिसेंबर २०१८ पर्यंत या जागेवर लावण्यात आलेला नव्हता. या ठिकाणी फलक लावलेला असता तर आम्ही या परिसरात घर घेण्याअगोदर याचा नक्कीच विचार केला असता.

ही स्मशानभूमी  सीएनजी किंवा एलपीजी वरती चालणारी व बंदिस्त असून तेथे पारंपरिक लाकडी अथवा इंधनावर  चालणारी यंत्रणा येणार नाही. ही चांगली बाब असली तरीही आमच्या घरांपासून स्मशानभूमीचे अंतर जेमतेम 25-30 फूट आणि नदीकाठापासून 300 फुटांवर आहे. आमची घरे पूर्वदिशेला असल्यामुळे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थेट लोकांच्या घरात स्मशानभूमीची दूषित हवा, ज्वलनापासून निर्माण होणारा धूर आणि वास पूर्ण परिसरात सर्वदूर पसरून रहिवासी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उदभवू शकतो. त्यामुळे येथील नियोजित स्मशानभूमीचे  काम रद्द करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.