Pimpri : आरोपांमुळे बेजार महापालिका आयुक्तांना बदलीचे वेध ?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – भाजपचे दलाल, घरगडी, प्रवक्ते, भाजपधार्जिणे विरोधकांच्या या ‘शेलक्या’ विशेषणांमुळे आणि थेट भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोपांनी बेजार झालेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बदलीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकीत आपल्याला अधिक लक्ष्य केले जाईल, याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकांपुर्वीच बदलीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष किरण गित्ते यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी वर्णी लागावी यासाठी हर्डीकर यांचे ‘लॉबिंग’ सुरु असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आयुक्तांचा महापालिकेतील दोन वर्षांचा कार्यकाळ अतिशय निराशाजनक असून कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अत्यंत विश्वासू आणि नागपूर महापालिकेत आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांना पिंपरी पालिकेत आयुक्त म्हणून पाठविले. त्यांनी नागपूरमध्ये अतिशय चांगले काम केले होते. त्यांच्या कामाचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कौतुक केले होते. 27 एप्रिल 2017 रोजी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेणारे हर्डीकर पिंपरी पालिकेत देखील चांगले कामकाज करतील, असा विश्वास होता. परंतु, दोन वर्षाच्या कारकिर्दीत तसा कारभार त्यांना करता आला नाही. गतिमान, कार्यक्षम प्रशासन आणि पारदर्शक कारभारावर भर देऊ असे जाहीर करणा-या हर्डीकर यांच्या राजवटीत सर्वाधिक गडबड घोटाळे झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांच्याकडून पक्षपातीपणा केला जात आहे. ते भाजपधार्जिणे असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वेळोवेळी केली आहे.

दोन वर्षाच्या कारकिर्दीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक देखील मोठा नवीन प्रकल्प हाती घेतला नाही. एकही चमकदार, उठावदार काम करता आले नाही. पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाचे भुमिपूजन होऊन देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. पाण्याचे नियोजन देखील आयुक्तांना करता आले नाही. कचरा कोंडी सोडविता आली नाही. आरोग्याचे तीनतेरा वाजले आहेत. महापालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प देखील अतिशय निराशाजनक आहे. त्यामध्ये एकही नाविन्यपूर्ण प्रकल्प नाही. त्यामुळे आयुक्तांना शहर विकासाचे ‘व्हिजन’ नसल्याचा आरोप विरोधकांडून होत आहे.

आयुक्तांचा प्रशासनावर कसलाच वचक राहिला नाही. बजबजपुरी माजली आहे. प्रशासन ढिम्म झाले असून कामचलाऊ पद्धतीने कामकाज सुरु आहे. अधिकारी, कर्मचा-यांवर आयुक्तांचा वचक राहिला नाही. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. केवळ दैनंदिन कामकाज पार पाडले जात आहे. शहर विकासावर त्याचा परिणाम होत असून विकासाला खिळ बसली जात आहे. आयुक्त एका निर्णयावर ठाम राहत नाहीत. राजकीय दबाव आणि धरसोड वृत्तीमुळे ते अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. निर्णय बदलण्यात ते माहीर आहेत.

आयुक्त केवळ काही पदाधिका-यांच्या सांगण्यावरुन ‘आदेश’ फिरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना काम न करता केवळ ‘आदेश काढणारे आयुक्त’ असे उपरोधिकपणे विरोधक बोलत आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहेत. आयुक्तांकडून अनेकदा सत्ताधा-यांना अनुकूल अशी भूमिका घेतली जाते. त्यामुळेच ते विरोधकांच्या रडारवर आहेत. आगामी निवडणुकीत आपल्याला अधिक लक्ष्य केले जाईल. आपला चुकीचा कारभार चव्हाट्यावर येईल, याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी बदलीसाठी हालचाली सुरु केल्याची जोरदार चर्चा आहे. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष किरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला असून त्यांची बदली झाली आहे. त्यांच्याजागी आपली वर्णी लागावी यासाठी आयुक्त हर्डीकर प्रयत्नशील असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या 37 वर्षाच्या इतिहासातील सर्वांत बदनाम झालेले आयुक्त

पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यामध्ये तत्कालीन सत्ताधा-यांबरोबरच प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांचे मोठे योगदान आहे. आजपर्यंतच्या प्रत्येक आयुक्तांनी आपल्या राजवटीत चमकादार कामगिरी करुन आपला ठसा उमटवला होता. अनेक आयुक्त पालिकेत येऊन गेले. परंतु, आजपर्यंत कोणत्याही आयुक्तांची एवढी बदनामी झाली नाही, तेवढी विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांची झाली आहे, असे बोलले जात आहे.

राजकीय दबाव आणि धरसोड वृत्तीमुळे अपयशी

आयुक्त श्रावण हर्डीकर कर्तव्यदक्ष, सजग, हुशार, प्रामाणिक आहेत. त्यांच्या हेतुविषयी शंका नाही. पण, राजकीय दबाव आणि धरसोड वृत्तीमुळे ते अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत एकाही आयुक्तांवर एवढे आरोप झाले नाहीत, तेवढे हर्डीकर यांच्यावर झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.