Pimpri: ……अन्यथा महापालिका प्रशासकीय इमारतीची जागा बदलणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी नऊ मजली इमारत बांधण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनी जवळील आरक्षित भुखंडावर नवीन इमारत बांधण्याच्या नियोजन आहे. तथापि, काही लोकप्रतिनीधींनी जागेबाबत आक्षेप नोंदविले आहेत. सूचना केल्या आहेत. त्यामधून सर्वसहमतीने योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अन्यथा जागा बदलली जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पिंपरीत महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर सातत्याने महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. तीन मजल्यावर अधिका-यांची दालने तर, तीस-या मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत. कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनी जवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजल्याची टोलेजंग इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. साडेचार एकरामध्ये इमारतीचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अगोदर 200 कोटी खर्च अपेक्षित धरला होता. परंतु, त्यामध्ये वाढ करत खर्च आता 299 कोटी रुपयांवर केला आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”जागा कमी पडत असल्याने प्रशासकीय कामकाजासाठी नवीन इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले. मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनी जवळील आर टू आर अंतर्गत मिळालेल्या जागेवर बांधण्याचे नियोजित आहे. गटनेत्यांना त्याचे सादरीकरण केले. त्यानंतर निविदा प्रसिद्ध केली. दरम्यानच्या काळात त्याबाबत वेगवेगळी मते येत आली आहेत. आक्षेप, तक्रारी आल्या आहेत. त्यावर विचार सुरु असल्याने जागेबाबत निर्णय घेतला नाही. सर्वांच्या सहमतीने योग्य तो तोडगा काढला जाईल. त्याच जागेवर करु अन्यथा जागा बदलण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.