Pimpri : ‘विष्णू’ अवतारातील प्रधान सेवकाचा प्रभाव संपला – डॉ. रत्नाकर महाजन

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियान

एमपीसी  न्यूज – स्वत:ला ‘विष्णू’ चा अवतार म्हणवून घेण्यात धन्यता माणणा-या प्रधान सेवकाचा प्रभाव आता संपला आहे. मागील साडेचार वर्षात देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी विरोधकांवर पातळी सोडून टिका करीत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व व प्रधानसेवक करीत असल्याचा टोला कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी थेरगांव लगावला.

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शनिवार (दि. 8 डिसेंबर) पासून जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत थेरगांव, ड्रायव्हर कॉलनी येथे काल या अभियानाचा शुभारंभ प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या  उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे, अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे संघटक व महाराष्ट्राचे निरीक्षक मनोज बागडी, महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय विभाग उपाध्यक्ष गौतम आरकडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक परशुराम गुंजाळ, प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, युवक शहर अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, सुंदर कांबळे, सज्जी वर्की, हिरा जाधव, संदेश बोर्डे, चंद्रशेखर जाधव, अनिकेत आरकडे आदी उपस्थित होते.

डॉ. महाजन म्हणाले की, ज्यांना मनमोहनसिंग  सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा रुचल्या नाहीत त्या भांडवलदारांनी सूड भावनेने काँग्रेस विरोधात काम केले. भाजपने काँग्रेसची खोटी बदनामी करून सत्ता मिळवली. भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नसताना अनेक आरोप भाजपने केले. खोटी आश्वासने देऊन मिळविलेली सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या स्थराला जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे इव्हीएम मशीनचे वृत्त सर्वांनी पाहिले आहे. ही मंडळी देश विकायला निघाली आहेत त्यांच्या तावडीतून देश मुक्त करावा असेही आवाहन डॉ. महाजन यांनी नागरिकांना केले. काँग्रेसच्या विधवेने विधवा महिलांचे अनुदान खाल्ले अशी देशातील महिला भगिनींचा अपमान करणारी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान निवडणूकीत प्रचारात वापरली. अशी गावगुंडांची भाषा पंतप्रधानांनी वापरावी हे दुर्दैव असल्याचेही डॉ. महाजन म्हणाले.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी अभियानाबाबत माहिती दिली. शहरात प्रथम ब्लॉक पातळीवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागात जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. काँग्रेस सरकारने सत्तेवर असताना देशासाठी केलेले काम लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. त्याबरोबरच भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची झालेली आर्थिक, सामाजिक पीछेहाट लोकांसमोर आकडेवारीसह ठेवण्यात येणार असल्याचेही साठे यांनी सांगितले. काँग्रेसने जनहिताचे अनेक निर्णय घेतले तरीही विरोधक काँग्रेसने साठ वर्षात काय केले असा प्रश्न करत आहेत म्हणून आम्ही जे केले तेच सांगत आहोत. काँग्रेसने कधीच केलेल्या कामाचे दिंडोरे पिटले नाहीत. याउलट भाजपने सत्तेवर येण्यासाठी प्रत्येकांच्या खात्यात 15 लाख जमा करू यासारखी अनेक खोटी आश्वासने दिली. नोटबंदीत सामान्य माणूस भरडला गेला. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली सामान्यांच्या पैशावर दरोडा टाकला गेला. रोजगार, उद्योग अडचणीत आले हे अपयश लपविण्यासाठी भाजप राम मंदिर सारख्या प्रश्नात लोकांना गुंतवून ठेवत असल्याचा आरोप साठे यांनी केला.

सुत्रसंचालन मयुर जयस्वाल आणि आभार नरेंद्र बनसोडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.