Pimpri : शहरातील दैनंदिन कचरानिर्मिती साडेबाराशे टनांवर!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबर दैनंदिन कचऱ्यातही वाढ होत आहे. सात वर्षांपूर्वी 832 टन असलेला ओला, सुका कचरा आता एक हजार २५० टनांवर पोहोचला आहे. महापालिका हद्दीबाहेरील खडकी आणि देहूरोड कटक मंडळाचा कचराही मोशीतच आणला जातो. परिणामी, मोशीतील डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर उभारला जात असून, डेपोची क्षमता संपत आली आहे. तसेच आता नव्या कचरा डेपोची गरज भासू लागली आहे.

उद्योगनगर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा चहुबाजूने झपाट्याने विस्तार होत आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने नागरिक वास्तव्यासाठी पिंपरी-चिंचवडला पसंती देत आहेत. त्यामुळे मोठमोठ्या गृहप्रकल्पांची उभारणी केली जात आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांवर पोहोचली आहे.

लोकसंख्या वाढत असतानाच शहरात वाढत्या कचऱ्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. सन 207 मध्ये शहरात प्रतिदिन 832 टन दैनंदिन ओला, सुका कचरा निर्माण होता. मात्र गेल्या सात वर्षांत कचरा निर्मितीमध्ये चारशे टन वाढ झाली आहे. सध्या सुमारे साडेबाराशे टन दैनंदिन कचरा निर्माण होत आहे.

Pune : तुनवाल ई-मोटर्सतर्फे पोलिसांना दुचाकी, बॅरिकेडची अनोखी भेट

घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे (Pimpri) महापालिकेकडून संकलन करून तो मोशीतील कचरा डेपोत टाकला केला जातो. या कचरा डेपोची निर्मिती 1991 मध्ये झाली आहे. सुमारे 81एकर असलेल्या या कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. पुनावळे येथे कचरा डेपो करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

मात्र, त्या जागेचा अद्याप मुहूर्त लागत नाही. त्यामुळे महापालिकेने मोशीतील कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी वीजनिर्मितीसारखे प्रकल्प हाती घेतले आहेत. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून खतनिर्मिती केली जाते. प्लॅस्टिकच्या कचऱ्यातून इंधन निर्मिती केली जात आहे.

“दैनंदिन कचरा निर्मितीमध्ये वाढ झाली आहे. प्रतिदिन सुमारे साडेबाराशे टन कचरा संकलित होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यावर महापालिकेचा भर असणार आहे”, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.