Pimpri : पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन सराईत तडीपार

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

विशाल बबन गायकवाड (वय 22, रा. गिरजूबाबा मंदिरामागे, बौद्धनगर, पिंपरी), कृष्णा उर्फ दाद्या गणेश भोसले (वय 19, रा. नाल्याजवळ, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

विशाल याच्यावर गंभीर दुखापत करण्याची धमकी, दमदाटी करणे, शस्त्र जवळ बाळगणे, मुंबई जुगार अधिनियमान्वये गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा याच्यावर घरफोडी, चोरी, घातक हत्याराने दुखापत करणे, धमकी, दुखापत, दरोड्याची तयारी, खून यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यावरून दोन्ही सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिमंडळ एक मधून 15 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये निगडी पोलीस ठाण्यातील एक, पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच, चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, दिघी पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण 12 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.