Pune: गुड न्यूज! ‘कोरोनाबाधित’ आईने दिला ‘कोरोनामुक्त’ बाळाला जन्म!

एमपीसी न्यूज – कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आईने जन्म दिलेल्या बाळाच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटीव्ह’ आला आणि कुटुंबियांसह उपचार करणारे डॉक्टर व रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कोरोनाची बाधा झालेल्या एका महिलेची ससून रुग्णालयात शुक्रवारी (18 एप्रिल) प्रसुती झाली. सुरक्षित प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे नवजात बाळालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने त्याचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात नवजात बाळाला कोरोनाची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. या बाळाचे वजन साडेतीन किलो असून प्रकृतीही उत्तम आहे. वेगळ्या कक्षामध्ये डॉक्टर व नर्स या बाळाची काळजी घेत आहेत.

याशिवाय कोरोना विषाणूची बाधा झालेल्या पाच लहान मुलांवर देखील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. या मुलांची विशेष काळजी घेण्यासोबतच त्यांना प्रबोधनात्मक आणि मनोरंजनाची पुस्तकेही रुग्णालय प्रशासनाच्या वतीने भेट देण्यात आली.

ससून रुग्णालयात सध्या 90 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 25 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांच्या देखरेखीसाठी 31 वरिष्ठ डॉक्टर, 70 निवासी डॉक्टर आणि 76 परिचारिका कार्यरत आहेत. ससून रुग्णालयात आतापर्यंत 42 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.