Pune Crime : ब्रेकअपनंतर प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकराची तिच्या घरातच जबरी चोरी; युट्युबवरून घेतले धडे

एमपीसी न्यूज : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याच्या (Pune Crime) रागातून प्रियकराने बदला घेण्यासाठी तिच्या घरात शिरून जबरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 14 लाख 67 हजाराचा मुद्देमाल त्याने चोरला होता. परंतु, भारती विद्यापीठ पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला असून प्रियकराला अटक केली आहे. सुमित बाबू परदेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2 ऑक्टोबर रोजी आंबेगाव परिसरातील लक्ष्मी गार्डन सोसायटीत घरफोडीचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत एका तरुणीने तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी तपासले असता एक संशयित व्यक्ती त्यात दिसून आला. अधिक माहिती काढून त्याची ओळख पटवली आणि त्यानुसार पोलिसांनी परदेशी (Pune Crime) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 14 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, फिर्यादी तरुणी आणि आरोपी सुमित यांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले होते. आपली प्रेयसी इतरांशी बोलत असल्याच्या रागातून त्याने तिला धडा शिकवण्याचे ठरवले. यासाठी त्याने चोरी कशी करावी याची युट्युबवरून माहिती घेतली आणि त्यानंतर मास्क घालून वेशांतर करत घरफोडी केली होती. मात्र, पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.