Rashmi Shukla : रश्मी शुक्लांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल?

एमपीसी न्यूज : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फोन टॅपिंग केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार संजय काकडे आणि माजी आमदार आशिष देशमुख यांची फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत असताना त्यांनी बच्चू कडू, नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख यांना विविध नावे देत त्यांचे फोन टॅपिंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीचा अहवाल आल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन पुन्हा शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर नव्याने आलेल्या सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला असल्याची माहिती समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.