Pune : सुरक्षेचा विचार करताना व्यापक दृष्टीकोनाची गरज – अजित गुलाबचंद

एमपीसी न्यूज – संकटकाळात किंवा अपघात (Pune) घडल्यास काही सुरक्षा मिळावी या हेतूने आपण हेल्मेट, सीट बेल्ट सारख्या उपाययोजना करतो. मात्र, त्या पुरेशा नसून सुरक्षेसंदर्भात जागरूक असलेली संस्कृती घडविण्यासोबतच सुरक्षेचा विचार करताना व्यापक दृष्टीकोनाची गरज आहे, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचे उत्कृष्ट उपाय करणाऱ्या आणि उत्कृष्ट सुविधा देणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे नुकतेच गौरविण्यात आले, त्यावेळी अजित गुलाबचंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात येणाऱ्या या सुरक्षा पुरस्कारांचे हे प्रथम वर्ष असून राजा बहादूर मिल रस्त्यावरील हॉटेल ग्रँड शेरेटन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमावेळी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे संचालक जितेंद्र ठक्कर, पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, एस जे कॉन्ट्रॅक्ट्स प्रा लि चे संस्थापक संचालक सुहास जंगले, क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव अश्विन त्रिमल, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जे.पी श्रॉफ, क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीच्या समन्वयक व कार्यक्रमाच्या निमंत्रक सपना राठी, सह समन्वयक मिलिंद तलाठी व पराग पाटील (Pune) आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले .

यावेळी बोलताना अजीत गुलाबचंद म्हणाले की, “सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून सुरुवातीपासूनच्या टप्प्यातच याचा अंतर्भाव व्हायला हवा. वास्तुविशारद एखाद्या प्रकल्पाची रचना करतात, अगदी त्या वेळेपासून सुरक्षेच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे आहे.

प्रकल्पाचे बांधकाम सुरु असताना आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित इमारत वापरात आल्यावर अशा दोन्ही टप्प्यांमध्ये सुरक्षेच्या अंगाने सखोल विचार होऊन त्यासंबंधी आवश्यक सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यासाठी आधीच विचार व्हायला हवा. अत्यंत छोट्या प्रमाणात होणारे अपघात किंवा नशीबाने टळलेले अपघात यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, जेणेकरून सुरक्षा व्यवस्था अधिक परिणामकारक आणि सक्षम होण्यास मदत होईल.”

रणजित नाईकनवरे म्हणाले, “बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम सुरु असलेल्या आपापल्या प्रकल्पांवर सुरक्षेचे उपाय करावेत. यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने सुरक्षा पुरस्कारासारखा उपक्रम क्रेडाई पुणे मेट्रोने हाती घेतला आहे. बांधकाम साईटवर अपघात घडल्यास इतर उद्योगांसारखी वागणूक बांधकाम व्यवसायिकांना मिळत नाही. बांधकाम व्यवसायात सगळेच कायद्याच्या कचाट्यात सापडतात.

पाश्चिमात्य विकसित देशांमध्ये सुरक्षेच्या उपायांवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिल्या जाते, तसे भारतात देखील व्हायला हवे आहे.” संभाव्य अपघातांची यादी करून त्यासाठी आवश्यक सुरक्षेचे उपाय उपलब्ध करून देण्यात पाश्चिमात्य देशांत मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. तसेच याविषयी जागरूकता निर्माण करून त्याविषयीची संस्कृती रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, असेही नाईकनवरे यांनी सांगितले. यंदा या सुरक्षा पुरस्कारांमध्ये 75 सभासद बांधकाम व्यवसायिकांनी सहभाग घेतला, अशी माहितीही नाईकनवरे यांनी दिली.

पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामाचे कौतुक केले व बांधकाम साईटवर अपघात (Pune) झाल्यास अपघात झालेल्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना तातडीने सर्वोतोपरी मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात वितरीत झालेल्या पुरस्कारांमध्ये 1 लाख स्के. फूटांपर्यंत बांधकाम झालेल्या विभागात भंडारी असोशिएटस (प्रकल्प – 43 प्रायव्हेट ड्राईव्ह) यांना सुवर्ण पुरस्कार देत गौरविण्यात आले. 1लाख ते 5 लाख स्के फूटांपर्यंत बांधकाम झालेल्या विभागात प्राईड बिल्डर्स यांना (प्रकल्प – प्राईड अटलांटिक) रौप्य पुरस्कार, मालपाणी इस्टेट यांना (प्रकल्प – एम फाल्कन) सुवर्ण पुरस्काराने गिरविण्यात आले.

5 लाख स्के फूटांहून अधिक बांधकाम झालेल्या विभागात प्राईड पर्पल यांना (प्रकल्प पार्क टायटन साईट) रौप्य पुरस्कार, एस जे कॉन्ट्रॅक्ट्स प्रा लि यांना एज 10 साईट, दी सेंट्रल पार्क रुणवाल आणि एएनपी कॉर्प युनिव्हर्स या तीनही प्रकल्पांसाठी विभागून सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Maratha Reservation : आरक्षण नसल्याने मुलाला नोकरी मिळत नाही; लातूरच्या माजी सरपंचाची आळंदीत आत्महत्या

याशिवाय विशेष श्रेणीमध्ये पेगॅसस प्रॉपर्टीच्या मेगापॉलिस सेरेनिटी प्रकल्पाला आऊटस्टॅडिंग सेफ्टी ऑफिसर पुरस्कार, बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन्स टेक प्रा लि यांना म्हाडा, ताथवडे या प्रकल्पासाठी व्हॅलिडेशन ऑफ टूल्स अँड मशिनरी पुरस्कार, गेरा डेव्हलपमेंटसच्या गेराज प्लॅनेट ऑफ जॉय या प्रकल्पाला झिरो अॅक्सिडेंटस पुरस्कार, गोयल गंगा समूहाच्या गंगा अस्मी प्रकल्पाला साईट सेफ्टी मॅनेजमेंट पुरस्कार, रोहन बिल्डर्सच्या रोहन आनंद प्रकल्पाला सेफ्टी ट्रेनिंग पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमासाठी एस जे कन्स्ट्रक्शन्स आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स यांचे विशेष सहाय्य लाभले तर निवड प्रक्रियेत सीक्यूआरए यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मानपत्र, मानचिन्ह व रोख स्वरूपात हे पुरस्कार देण्यात आले.
समीर बेलवलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जे पी श्रॉफ यांनी प्रास्ताविक केले तर अश्विन त्रिमल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.