Pune News : अमेरिकास्थित शेंदूरे परिवाराकडून विद्यार्थी सहाय्यक समितीला अडीच कोटींची देणगी

एमपीसी न्यूज – अमेरिकेतील रजनी व अशोक शेंदुरे यांच्या परिवाराने (Pune News) विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पुण्यातील मुलींच्या वसतिगृहासाठी साडेतीन लाख डॉलर्सची (सुमारे 2 कोटी 80 लाख रुपये) देणगी नुकतीच जाहीर केली. ग्रामीण भागातील मुलींची पुण्यात उच्च शिक्षणाला येण्यासाठी संख्या वाढत आहे. परवडणारा दर आणि सुरक्षितता यादृष्टीने त्यांचा समितीकडे कल असतो. परंतु, मर्यादित जागांमुळे प्रवेशाला अडचणी येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीने शिवाजी हौसिंग सोसायटी जवळील जागेत मुलींसाठी नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरु केले आहे.

या वसतिगृहाच्या एका विंगसाठी ही देणगी देण्यात आली. त्यातून 84 मुलींच्या निवासाच्या व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेंदुरे परिवार मूळचे कोल्हापूरजवळील असून पन्नासहून अधिक वर्षे अमेरिकेत वास्तव्याला आहेत.

महाराष्ट्र फौंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव काही महिन्यांपूर्वी पुण्यात आल्यावर समितीचे काम पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी या विधायक कामाला आर्थिक मदत उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.

अमेरिकेत गेल्यावर शेंदुरे परिवाराशी समितीच्या कामाबाबत चर्चा करून या देणगीबाबत विनंती (Pune News) केली. त्यांच्या आणि समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके यांच्या पाठपुराव्यामुळे या मुलींच्या वसतिगृहाच्या कामासाठी मोठा आर्थिक हातभार लाभला आहे.

PM Modi Visit US : मोदी-बायडेन मैत्रीने भारताला मिळणार ‘हे’ आठ फायदे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.