Pune News : ‘मोठा नट; साधा माणूस’ कार्यक्रमात उलगडला अभिनेते निळू फुले यांचा कलाप्रवास

बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने 'ऐसी अक्षरे'च्या 'मराठी चित्रपटाला साहित्यिकांचे योगदान' या विशेषांकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – शेकडो चित्रपटांत खलनायक साकारणाऱ्या निळू फुले यांनी आपल्या प्रत्येक ( Pune News ) अभिनयात सूक्ष्म छटा सादर करीत सगळ्याच भूमिका वेधकपणे साकारल्या इतकेच नव्हे तर सामाजिक भान सांभाळत आपले मृदू व्यक्तिमत्त्वही कायम जपले. त्यांचा मोठा नट आणि तरीही एक साधा माणूस हा प्रेरणादायी प्रवास आज पुणेकर रसिकांसमोर उलगडला.

निमित्त होते बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या कलारंग महोत्सवाचे… एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी सदर महोत्सवाला आज सुरुवात झाली. ‘मोठा नट; साधा माणूस’ या दृक श्राव्य कार्यक्रमाने महोत्सवाचा पहिला दिवस रंगला. याबरोबरच बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ‘ऐसी अक्षरे’च्या ‘मराठी चित्रपटाला साहित्यिकांचे योगदान’ या विशेषांकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गीतकार वैभव जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या व अभिनेत्री गार्गी फुले थत्ते, जावई ओंकार थत्ते, राजेश दामले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘मोठा नट; साधा माणूस’ या कार्यक्रमाचे लेखन सतीश जकातदार यांनी केले असून सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले यांनी हा कार्यक्रम केला.

पुण्याजवळच्या सासवडचा जन्म पण निळू फुले यांचे बालपण पुण्यात गेले. वडील स्वातंत्र्य चळवळीत ( Pune News ) कार्यकर्ते होते त्यामुळे देशभक्ती रक्तात भिनलेले. यातच राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाले. इथेच कलापथक आणि इंग्रजी सिनेमे बघायची सवय लागली आणि त्यांची अभिनयाची आवड आणखी वाढली. सुरुवातीला माळी काम करून रात्री कलापथकाचे प्रयोग त्यांनी केले. इथून सुरू झालेला निळू फुले यांचा प्रवास पुढे 2009 पर्यंत अविरत सुरू राहिला.

 

Today’s Horoscope 08 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

‘सखाराम बाईंडर’ मधला सखाराम आजही सर्वच रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा आहे. समाजवादी विचारांशी ताळमेळ साकारणाऱ्या भूमिका आपल्याला मिळत नाही ही खंत निळू फुले यांना कायम होती. ही संधी त्यांना ‘सूर्यास्त’ या चित्रपटामध्ये अप्पाजींच्या भूमिकेत मिळाली. आणि त्यांनी ती जिवंत केली. अभिनयाचा अलौकिक वस्तुपाठ या भूमिकेने घालून दिला असे सांगत राजेश दामले पुढे म्हणाले, ‘एक गाव बारा भानगडी’ या पहिल्या चित्रपटातून निळू फुले यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

 

यामधील बेरकी झेले आण्णा महाराष्ट्रभर गाजला. शेकडो चित्रपटात यानंतर त्यांनी खलनायक रंगवला पण प्रत्येक भूमिकेत सूक्ष्म छटा सादर करीत त्यांनी भूमिका वेधक पणे साकारली. निळू फुले यांनी मराठी चित्रपटाचा चेहरा मोहरा बदलला. सामना, सिंहासन यांबरोबरच निळू फुले यांनी काम केलेल्या अनेक चित्रपट व नाटके यांचा काही भाग यावेळी दाखविण्यात आल्या. डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले यांचे नातेही यावेळी उपस्थितांनी दृकश्राव्य माध्यमातून अनुभविले.

यानंतर गीतकार वैभव जोशी यांचा ‘ही अनोखी गाठ‘ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये वैभव जोशी यांनी त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या कवी व गीतकारांचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. कैवल्यगान या मी वसंतराव देशपांडे चित्रपटातील गीताचा प्रवास कथन करीत वैभव जोशी यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरूवात केली.

आज चालीवरती गाणी लिहिली जातात असे सांगत वैभव जोशी म्हणाले, “गीत लिहीत असताना मी आधी शब्द लिहिण्यास प्राधान्य देतो. मी तबला शिकलो असल्याने संगीताचे ताल समजणे मला सोपे जाते.” यानंतर सुरेश भट यांच्या गझलस् चे संदर्भ देत वैभव जोशी यांनी काही गझल सादर केल्या. ‘पोस्टर गर्ल’ चित्रपटातील रघुमाईच्या गीताचा प्रवास जोशी यांनी सर्वांसमोर मांडला. आनंदी गोपाळ चित्रपटातील गाणी देखील त्यांनी यावेळी सादर केली.

उद्या महोत्सवात (शनिवार, 8 एप्रिल) ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मान प्रदान करीत गौरव करण्यात येईल. यानंतर राजेश दामले हे सचिन खेडेकर यांची प्रकट मुलाखत घेतील सदर कार्यक्रम सायं 6.30 वाजता एरंडवणे येथील डी पी ( Pune News ) रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.