Pune : रेडी रेकनर दरात बदल नको, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे 

एमपीसी न्यूज –  राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने रेडी रेकनर (Pune) दरात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला असल्याची बातमी समजली. रेडी रेकनर दरात वाढ झाल्यास घरांच्या किंमती वाढून गृह खरेदीदारांसोबतच बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर देखील ताण वाढेल. यामुळे घर खरेदीदार व बांधकाम व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी रेडी रेकनर दरात बदल करू नये अशी मागणी बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी केली आहे.

पुण्याचा विचार केल्यास रेडी रेकनर दरात 5 ते 8 टक्के इतकी वाढ झाली तर मुद्रांक शुल्कही वाढेल आणि घरांच्या किंमतीत देखील किमान 2 ते 5 लाख रुपये इतकी थेट वाढ होईल, असा अंदाज आहे. यामुळे घर खरेदीचा सध्याचा असलेला ग्राहकांचा कल कमी होईल आणि पर्यायाने याचा परिणाम बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर होईल. या सर्व बाबी विचारात घेता रेडी रेकनर दरात वाढ न करता ते स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी क्रेडाई पुणे मेट्रोची भूमिका असल्याचे नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

Mp Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळातील गावांना निधी देत विकासाला चालना

रेडी रेकनर दर हे ग्राहकांची खरेदी क्षमता आणि बांधकाम खर्च यांवर थेट प्रभाव करत असतात, तसेच हा परिणाम कायमस्वरूपी असतो. त्यामुळेच हे दर स्थिर असावेत अशी मागणी आम्ही करीत आहोत असे सांगत नाईकनवरे पुढे म्हणाले, पुण्याच्या दृष्टीने विचार केल्यास बांधकाम व्यवसाय क्षेत्रात सातत्याने प्रगती करणारे तरीही देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत परवडणारे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. 2019 च्या तुलनेत 2023 या वर्षांत देशातील सर्वांत वेगाने वाढणारे रिअल इस्टेट मार्केट म्हणून आज पुणे समोर आले आहे. पुणे विभागात 2023  या वर्षात देशातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल 90 हजार घरांची विक्री झाली आहे.

मागील वर्षी रेडी रेकनर दर स्थिर असल्याने दस्त नोंदणीत वाढ झाली असून 11 महिन्यात राज्याला 42 हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाढ झाल्याचे त्यावरून स्पष्ट होते. पुणे विभागातील सरासरी घरांच्या किंमतीचा विचार केला तर ही किंमत 64 लाख रुपये इतकी आहे. देशातील इतर भागांशी तुलना करता पुणे देशातील प्रमुख मेट्रो शहरांपैकी आजही पहिल्या पसंतीचे आणि परवडणारे शहर आहे. रेडी रेकनरचे  दर वाढल्यानंतर घरांच्या किंमती वाढून पुणे हे परवडणारे शहर राहणार नाही हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवे आहे.

यासंदर्भात राज्य सरकार व संबंधित विभाग यांच्याशी आम्ही नियमितपणे संवाद साधत असून रेडी रेकनर दरा सोबत जाहीर केल्या जाणाऱ्या तळटीपे मध्ये ही काही महत्त्वाचे बदल आम्हाला अपेक्षित आहेत अशी माहितीही नाईकनवरे यांनी (Pune) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.