Pune : पद्मश्री पं व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने नादमुद्रा महोत्सवाचा समारोप

एमपीसी न्यूज – पद्मश्री पं व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने ( Pune ) तीन दिवसीय नादमुद्रा महोत्सवाचा आज समारोप झाला. अल्फा इव्हेंटस् च्या वतीने आणि बेलवलकर हाऊसिंग यांच्या सहकार्याने आयोजित नादमुद्रा महोत्सव कर्वेनगर येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग येथे नुकताच संपन्न झाला.

या महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला होता. कार्यक्रमाचे आयोजक निखिल जोशी, सुप्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर, विदुषी मीरा पणशीकर, समीर बेलवलकर, संपदा बेलवलकर, पंडित विजय कोपरकर आदी यावेळी उपस्थित होते.

Nigdi : महिला वाहतूक पोलिसांचा मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडीच्यावतीने सन्मान

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात पं भास्करबुवा जोशी व विदुषी मीरा पणशीकर यांची शिष्या अपर्णा पणशीकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग पूरीया धनाश्रीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘बल बल जाऊ तोरे कारन… ‘ ही बडा ख्याल मधील विलंबित एकताल मधील तर ‘पायलिया झंकार मोरी… ही छोटा ख्याल मधील द्रुत तीन तालातील बंदिश सादर केली.

यानंतर लाजवंती रागातील झपतालातील ‘हूं नहीं माने…’ ही बंदिश अपर्णा पणशीकर यांनी गायली. यानंतर आपल्या आई विदुषी मीरा पणशीकर यांची ‘तोहे देख न को प्राणप्रिया…’ ही द्रुत एकतालमधील बंदिश प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संजय देशपांडे (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी), संपदा बेलवलकर (गायन) तर माधवी घुमटकर व शुभांगी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर सुप्रसिद्ध गायक पद्मश्री पं व्यंकटेश कुमार यांचे गायन संपन्न झाले. त्यांनी यावेळी राग बिहाग सादर केला. यामध्ये त्यांनी विलंबित एक तालातील ‘कैसे सुख सोवे नींदरिया…’ व ‘बालम रे मोरे मन की’ ही द्रुत तीनतालातील बंदिश प्रस्तुत करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

पुण्यात गायला कायमच आनंद होतो असे सांगत यानंतर त्यांनी राग कौशी कानडा मध्ये ‘राजन के राज श्रीराम चंद्र…’ ही विलंबित तीन तालातील बंदिश गायली. ‘ काहे करत मोसे बरजोरी..’ ही द्रुत तीन तालातील बंदिश त्यांनी गायली. यानंतर कोई नहीं अपना ही तीन तालातील बंदिश आणि भैरवी सादर करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) शिवराज पाटील व कैवल्य पाटील यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. नीरजा आपटे यांनी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन ( Pune ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.