Pune : रानातला कवी हरपला; ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ कवी व माजी आमदार ना. धो. महानोर यांचे पुण्यात निधन (Pune) झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे आज (गुरुवारी) सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या (शुक्रवारी) पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.

महाराष्ट्राच्या साहित्य वैभवात मोलाचे योगदान देणारे ‘रानकवी’ अशी ना. धो. महानोर यांची ओळख आहे. पानझड, रानातली कविता हे काव्यसंग्रह, गांधारी ही कादंबरी, गावाकडच्या गोष्टी हा कथासंग्रह, जैत रे जैत, एक होता विदूषक या चित्रपटांचे गीतकार असा महानोरांच्या साहित्य संपदेपैकी काही भाग इथे सांगता येईल.

1991 ला पद्मश्री आणि 2000 साली त्यांच्या पानझड या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. घराची हलाखीची परिस्तिथी असल्यामुळे लहानपणीच त्यांना शिक्षणासाठी नाही तर जगण्यासाठी आई वडिलांनी आपल्यापासून दूर दुसऱ्या गावी ठेवले.

तिथे बिगारी करून महानोरांनी शिक्षण चालू ठेवले. पण वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी महानोरांना घरी परतावं लागलं आणि तिथेच त्यांचे शिक्षण थांबले. हायस्कुलमध्ये असताना शिक्षकांनी वाचनाची गोडी निर्माण केली होती त्याचा त्यांना पुढे फायदा झाला. श्रमपरिहार म्हणून कविता म्हणणं आणि करमणुकीचे दुसरे काहीच साधन नाही म्हणून पुस्तकं वाचणे आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला आणि त्यातूनच त्यांच्यातील अस्सल कवीचा जन्म झाला.

रानात राहणारा हा कवी निर्सार्गाची भाषा बोलतो. आपल्या कवितेमध्ये जे लिहिले त्याला त्यांनी कृतीची जोड दिली. त्यांनी शेतात विविध प्रयोग केले आणि शेतकऱ्याच्या व्यथा वेळोवेळी मांडल्या. या सगळ्यामुळे त्यांच्यातील अस्सलपणा नेहमीच टवटवीत राहिला. 1978 साली ते विधानपरिषदेचे सदस्य झाले.

सरकारच्या जलसंधारणाच्या कामात त्याचे नेहमीच विशेष योगदान राहिले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. इतकेच नाही तर अलीकडेच फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या ‘जलस्वराज्य’ योजनेचे त्यांनी स्वागत केले होते.

यातून शेतकरी हिताला त्यांच्याप्रती असणारे प्राधान्य दिसून येते. शेती आणि पाण्याचे नियोजन केंद्रभागी ठेवून सरकारने विकास आराखडा तयार केला पाहिजे अशी त्यांची भूमीका आहे. चार कविता येतील किंवा येणार नाहीत पण शेतात कामं करत राहणं त्यांना जास्त महत्वाचं वाटतं. रसिकांकडून आपल्या कवितेसाठी आणि शेतीसाठी आशीर्वाद मागत असताना इतरांनीही शेतीकडे वळले पाहिजे असे आवाहन करायला महानोर विसरत नाहीत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.