Pune : ‘संचित’ एकल नृत्यमहोत्सवाला उत्साहात सुरुवात

एमपीसी न्यूज – संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या (Pune)सुप्रसिद्ध कथक गुरु शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेला 38 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित ‘संचित’ या एकल कथक नृत्य महोत्सवाला सुरुवात झाली.

कथक केंद्राच्या सल्लागार (Pune) समितीच्या अध्यक्षा आणि जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना उमा डोगरा यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. रविवार दिनांक 4 फेब्रुवारीपर्यंत मयूर कॉलनी येथील एम ई एस बालशिक्षण सभागृह या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होणार असून महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, ज्येष्ठ तबलावादक पंडित रामदास पळसुले, बंगळूरूचे नृत्य अभ्यासक आशिष मोहन खोकर, दिल्लीच्या नृत्य, संगीत अभ्यासक असलेल्या मंजिरी सिन्हा, दिलीप माजगांवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमा डोगरा म्हणाल्या, “संचित हे नावच अध्यात्माशी जोडले गेले आहे असे मला वाटते. प्रत्येक मोठा कलाकार हा संचित कर्मे घेऊन जन्माला आलेला असतो. शिष्याने गुरूच्या सहवासात राहून काय मिळविले आणि गुरूने शिष्याला काय शिकविले हे त्यांचे त्यांचे संचित आहे. गुरू आणि शिष्य परंपरा, त्यांच्यातील नाते आणि प्रेम हे दोहों कडूनही अपेक्षित आहे.”

आपल्या कलेच्या सादरीकरणामधून ऊर्जानिर्मिती होणे हे कलाकाराचे ध्येय असायला हवे असे सांगत पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, “गुरू शिष्य परंपरेत शिष्य हे गुरूचे आणि गुरू हे शिष्याचे संचित आहे. कलाकाराची कला ही आतमधून बाहेर येत असते. त्या कलेला पहिली दाद देणारा हा गुरू असतो. आपला शिष्य आपली शिकवण, आपली परंपरा पुढे घेऊन जात आहे याचे गुरूला मोठे समाधान असते. खऱ्या अर्थाने शिष्य हे गुरूचे धन असते.”

1970 पासून विद्यार्थी, शिष्य, शिक्षक ते गुरू हा शमा ताई यांचा प्रवास मी स्वतः पाहिला आहे. इतकेच नाही तर त्यांच्या अनेक विद्यार्थी कलाकार होताना देखील मी पाहिले आहे. यासाठी किती श्रम पडतात याची मला कल्पना आहे. आज शिष्य आपली परंपरा पुढे नेत आहेत हे पाहून शमा ताई यांचे मन निश्चितच निश्चिंत झाले असेल, असेही तळवलकर म्हणाले.

महोत्सवाच्या संकल्पनेविषयी बोलताना गुरु शमा भाटे म्हणाल्या, “38 वर्षांपूर्वी नादरूप या संस्थेच्या माध्यमातून कथक नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यास मी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात एकल कथक नृत्य हे नृत्याचा महत्त्वपूर्ण भाग होते, याद्वारे नादरूपचे अनेक शिष्य तयार झाले आणि आज सुप्रसिद्ध नृत्यांगना म्हणून त्यांनी वेगळी ओळख मिळविली आहे. काळानुरूप सांघिक नृत्य प्रकारास पसंती मिळू लागली. तसे नादरूपने नृत्यदिग्दर्शनावर भर देत अनेक सांघिक कार्यक्रम तयार करीत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख तयार केली. संस्थेच्या या वर्षीच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा एकदा एकल नृत्याला केंद्रस्थानी ठेवत आम्ही ‘संचित’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये माझ्या 10 शिष्यांचे एकल कथक सादरीकरण झाले.”

Pimpri : रावेत मधील संस्थाचालकावर पॉक्स को कायद्याखाली कडक शासन करा – नाना काटे

आज महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी, शिवानी करमरकर- शूरफेल्ड, मुक्ती श्री या शिष्यांचे सादरीकरण झाले. सुरुवातीला ईशा नानल, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी या तीन नृत्यांगनांनी सादरीकरण केले. त्यांनी कृष्ण वंदनेने आपल्या सुरुवात केली. यानंतर त्यांनी मध्य लय तीन ताल व द्रुत तीन तालचे प्रभावी सादरीकरण केले. हमीर रागातील तराना सादर करीत त्यांनी समारोप केला. त्यांना ईशान परांजपे (तबला), शुभम खंडाळकर (गायन), शिल्पा भिडे (पढंत), सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) आणि संदीप कुलकर्णी (बासरी) यांनी साथसंगत केली.

यानंतर शिवानी करमरकर- शूरफेल्ड यांचे सादरीकरण झाले. त्यांनी ताल पंचम सवारीचे दमदार सादरीकरण करीत उपस्थितांची वाह वाह मिळविली. त्यांना चारुदत्त फडके (तबला), यशवंत थिटे (संवादिनी), सुरंजन खंडाळकर (गायन), संदीप कुलकर्णी (बासरी) आणि अमीरा पाटणकर (पढंत) यांनी साथसंगत केली.

यानंतर मुक्ती श्री यांनी रूपक ताल सादर केला. वंदना सादर करीत त्यांनी सुरुवात केली. द्रुत तीन ताल आणि भजन देखील त्यांनी सादर केले. मुक्ती श्री यांना पंडित योगेश समसी (तबला), नागेश आडगांवकर (गायन), अभिषेक शिनकर (संवादिनी), संदीप कुलकर्णी (बासरी) आणि अन्वी श्री (पढंत) यांनी साथसंगत केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.