Pimpri: दिल्ली, मुंबईत बारणे यांची ‘फोटो काढणारा खासदार’ म्हणून ओळख – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरूवात करण्याचे आवाहन केले होते. परंतु, दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात ‘फोटो काढणारा खासदार’ म्हणून ओळख असलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे या आवाहनामुळे प्रचंड चिडल्याचे दिसत आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार जगताप यांच्या टीका केली होती. त्याला आमदार जगताप यांनी आज पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवडमधील रस्ते मोठे आणि प्रशस्त आहेत. तरीही शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते, हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन आपल्या स्तरावरून कारवाई करत असते. परंतु, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुढे येण्याचे आवाहन केले होते.

तसेच विकासाची दूरदृष्टी असेल, तर ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव परिसराचा विकास करण्याचे आव्हानही आपण दिले होते. नागरिकांच्या प्रश्नांचा खूपच कळवळा असल्यासारखे वागणाऱ्या बारणे यांनी हे आव्हान स्वीकारून पुढे येत अतिक्रमणांवर कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी शहरातील जनतेची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी आमच्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून प्रसिद्धी मिळवलीच.

पंतप्रधानांपासून ते अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जायचे आणि एखादे निवेदन देऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन करायचे. त्यानंतर त्याची भरपूर प्रसिद्धी मिळवायची आणि प्रत्यक्षात प्रश्न मात्र ‘जैसे-थे’  ठेवायचे, हीच त्यांची राजकीय पद्धत राहिली आहे. मोदी लाटेच्या कृपेमुळे खासदारकीची लॉटरी लागली. त्याचा उपयोग केंद्राशी संबंधित जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना करता आला नाही. ऊठसूठ महापालिकेत अधिका-यांच्या बैठका घेण्यावरून हे स्पष्ट होते.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर आल्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या रेडझोनसह अन्य प्रश्नांवर लोकांना काय उत्तर द्यायचे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नेत्यांसोबत फोटोसेशन केल्यानंतर आता गल्लीतील गोष्टींवरून ते प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी धडपडत आहेत. महापालिकेत खाबुगिरी असेल, तर चारवेळा नगरसेवक राहिलेल्या खासदार बारणे यांनी त्याचे पुरावे द्यायला कोणी अडविले आहे. मोघम आरोप करून आपण खरोखरच ‘फोटोवाला खासदार’  असल्याचे ते स्वतःहून जनतेसमोर सिद्ध करत आहेत, असेही आमदार जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.