Pimpri : ‘पोलीस पुस्तकातली माणसं नाही तर माणसातली पुस्तके वाचतात’

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी एमपीसी कट्ट्यावर

एमपीसी न्यूज – पोलीस हा एक साधारण माणूस असतो. त्यालाही इतरांप्रमाणे भावना असतात. मात्र सामान्य माणसं सर्वसाधारणपणे पुस्तकातली माणसे वाचतात. पण पोलीस माणसातलं पुस्तक वाचतो. समोरच्या माणसाला बघितल्यानंतर त्याला संपूर्णपणे वाचणे हा त्याच्या कामाचा भाग आहे, तर समोरच्या माणसाची कैफियत ऐकून घेणे हे त्याच्या संवेदनशील मनाचा मोठेपणा आहे. असे मत साहित्यिक, वैज्ञानिक आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी व्यक्त केले. एमपीसी न्यूजच्या एमपीसी कट्ट्यावर ते बोलत होते. भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, साहित्यिक आणि प्रशासकीय क्षेत्राविषयी त्यांनी प्रखर मत नोंदवत एक मृदू प्राध्यापक ते कणखर पोलीस अधिकारी यापर्यंतचा प्रवास यावेळी उलगडून सांगितला.

वंजारी म्हणाले की, सर्वसाधारणपणे लोक पोलीस ठाण्यात आनंद साजरा करायला जात नाहीत. आपली काहीतरी कैफियत, अडचणी घेऊन ते पोलिसांकडे जातात. त्यांची कैफियत व्यवस्थित ऐकून घेतल्यास समोरच्या व्यक्तीचा अर्धा भार हलका होतो. त्यामुळे पोलिसांना प्रत्येक व्यक्तीच्या मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. पण अलीकडच्या काळात पोलिसांमधील ही संवेदनशीलता कमी होत आहे. पोलिसांकडे संवेदनशीलता असावी पण त्या संवेदनशीलतेमध्ये वाहून न जाता लगेच कणखर पोलीस बनता यायला हवं.

साहित्याबद्दल बोलताना धनराज वंजारी म्हणाले, "पोलीस अधिकारी आणि प्राध्यापक हे दोघेही माझ्या एकाच शरीरात बसले असल्याने दोघांमध्ये ब-याच वेळेला द्वंद्व व्हायचे. यामध्ये प्रत्येक वेळी प्राध्यापक जिंकायचा. कारण पोलीस अधिकारी दिवसभर बाहेरच्या जगातून अनुभव घेऊन यायचा. पोलिसाने आणलेल्या अनुभवाला आतला प्राध्यापक शिजवून त्यातील योग्य अयोग्य सार काढून लिहायचा.

मुंबईमध्ये विविधांगी संस्कृती आहे. जशा संस्कृती आहेत तशाच विकृती सुद्धा आहेत. मुंबईची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अन्य शहरांपेक्षा प्रचंड वेगळी असल्याने इथे घडणारे गुन्हे आणि त्यांचा कसोशीने तपास करणारे मुंबई पोलीस, ही एक जीवघेणी कसरत आहे. गुन्हे शाखेच्या एका अहवालानुसार स्कॉटलंड पोलीस एक तर मुंबई पोलीस दुस-या स्थानावर आहेत. पण मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नांकडे पाहता मुंबई पोलीसच जगात पहिल्या क्रमांकावर आहेत, असेही ते म्हणाले.

भारतीय व्यवस्था राजकारण्यांनी वेठीस धरली आहे. भारतात कायद्याला अस्त्र म्हणून न वापरता राजकारणी लोक त्याचं शस्त्र म्हणून वापर करतात. याकडे पाहिल्यावर संविधानाचा खेळ झाल्याची जाणीव होते. सध्या भारतात बुद्धिप्रामाण्यापेक्षा शब्दप्रामाण्यावर लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या एखाद्याने बुद्धिप्रामाण्यावर भर दिला, तर त्यांना संपवण्यापर्यंत लोकांची मजल जाते. लोकांची मानसिकता संकुचित किंवा शब्दप्रामाण्याकडे वळवली जाते. याची मोठी किंमत समाजाला मोजावी लागणार आहे.

‘बेजुबा तर्ज’ या उर्दू काव्यसंग्रहाच्या आठवणी सांगताना त्यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत झालेला प्रसंग सांगितला. कविता संग्रहाचे नाव समजून सांगताना समर्थ रामदासांच्या दासबोध ग्रंथाचा संदर्भ सांगितला. तो संदर्भ जावेद अख्तर यांना पटला. त्यावेळी त्यांनी जावेद अख्तर यांच्या घरी दासबोध ग्रंथ बघितला. एक मुस्लिम कवी असून तो हिंदूंचे ग्रंथ वाचतो, हे पाहून त्यांना खूप हायसं वाटलं. कर्मयोगी माणसं खरोखर मोठी असतात. आपण त्यांना जाती-धर्माचे लेबल लावतो. असेही ते म्हणाले.

धनराज वंजारी यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जनाघाट या गावात अध्यात्मिक आणि शेतकरी घरात झाला. विद्यार्थी दशेत विनोबा भावेंच्या सर्वोदय विचाराने प्रेरित झालेले धनराज वंजारी 1979 साली मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी युनोतर्फे युरोप मध्ये आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी आणि तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. साहित्य क्षेत्रापासून ते युनोपर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 34 वर्षांच्या अथक आणि उत्तम सेवेनंतर 2013 साली ते निवृत्त झाले. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असून त्यांची सायबर फॉरेन्सिक लॉ-फर्म कंसल्टंसी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.