Kamshet : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांनाच शिक्षकाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांनाच शिक्षकाने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांची पाठ काळीनिळी झाली असून एका मुलाच्या कानाला दुखापत झाल्याचे समजते. हा प्रकार शुक्रवारी (दि. 23) संध्याकाळी कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात घडला. या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर आठवीच्या वर्गात काही विद्यार्थ्यांची भांडणे सुरु होती. ही भांडणे सोडवण्यासाठी दोन विद्यार्थी गेले. काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी आलेल्या एका शिक्षकाने भांडणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना रागावण्याऐवजी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोन मुलांना पायातील बुटाने बेदम मारहाण केली. त्यांना तिसऱ्या मजल्यावरून मारत मारत खाली आणले. या अमानुष मारहाणीमध्ये या दोन्ही मुलांची पाठ काळीनिळी झाली असून त्याना मोठी दुखापत झाली आहे.

घरी गेल्यावर हा सर्व प्रकार पालकांना कळताच त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन संबंधित शिक्षकाला आमच्या समोर हजर करा अशी मागणी केली. यावेळी सरपंच सारिका घोलप, शिवसेना शहर प्रमुख गणेश भोकरे, गणेश बोऱ्हाडे, सुजित सातकर, विशाल शिंदे हे मुख्याध्यापकांना जाब विचारण्यासाठी आले होते. त्यामुळे शाळेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संबंधित शिक्षक आज गैरहजर असून ते सोमवारी आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक माहुले यांनी सांगितले.

संबंधित मुलांचे पालक पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात तक्रार देण्यास गेले होते. मात्र शाळा प्रशासन व पालक यांच्यात परस्पर तडजोड झाल्यामुळे तक्रार दिली गेली नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.