मी सोडून सारे बंध….

एमपीसी न्यूज- ठीक सव्वासात वाजता ट्रेनने शिट्टी दिली, हात हलवून निरोप घेणारी प्लॅटफॉर्मवरची माणसे मागे पडू लागली, अवंतिका एक्सप्रेसच्या बोगीमधले पॅसेंजर आपापल्या जागी बसू लागले, हळूहळू स्टेशन मागे पडत गेले आणि सुरु झाली आम्हा मैत्रिणींची इंदूर ट्रीप. मागच्या चार महिन्यांपासून जिची आम्ही तेरा जणी अत्यंत उत्कंठेने वाट पाहात होतो ती आमची बहुचर्चित, बहुप्रतिक्षित इंदूर ट्रीप अखेरीस झुकुझुकु आगीनगाडीच्या तालावर सुरु झाली. कदाचित शाळेत अशा एकत्र कधीच ट्रीपला गेलो नसू पण आज पन्नाशी पार केलेल्या आम्ही तेरा शाळासोबतीणी संसार, मुलेबाळे, पाहुणेराहुणे, नोकरी, जबाबदा-यांचे गाठोडे सहजगत्या मागे टाकून कानात वारे भरलेल्या वासरासारखे उधळत निघालो होतो. जोडीदारांना लगेच ट्रेन वेळेत सुटल्याचे फोन करुन झाले आणि आम्हा सख्यांच्या जल्लोषाला उधाण आले.

तीन चार महिन्यांपूर्वी अशाच एकत्र जमलो होतो, तेव्हा कोणाच्यातरी सहज मनात आले, अरेच्चा आता आपली सगळ्यांची पन्नाशी पूर्ण झाली आहे. सगळ्यात लहान मेंबर म्हणजे स्मिता देवने आत्ताच्या स्मिता मदानेने देखील काही दिवसांपूर्वीच पन्नाशी ओलांडली. आता आपण कुठेतरी भटकायला जायला हवे. तसं पाहिलं तर यापूर्वी ब-याच वेळा एकत्र भेटलो होतो. पण अशा फक्त आम्ही मुलीच…हो खरंच की अजूनही मनात मुलीच येतं की…कुठेतरी चार पाच दिवसांसाठी जाऊया. मग मला वाटतं मीनलने सजेस्ट केले की इंदूरला जाऊया का? तारखांची अॅडजस्टमेंट झाली. त्यावेळी ज्या नव्हत्या त्यांच्याकडून कन्फर्मेशन घेतले आणि इंदूरची टूर फिक्स झाली. मधल्या काळात जाण्यायेण्याचे बुकिंग राजश्री आणि जयूने केले. तिथे राहण्यासाठी गोकुळ होम स्टेची निवड केली आणि तिथले बुकिंगपण जयूने केले. ट्रीपच्या चार दिवसांचा प्रोग्रॅम फिक्स झाला. सगळ्यांच्या संमतीने नयनने ड्रेसकोड ठरवला. जाताना जेवणासाठी काय काय घ्यायचे ते ठरले. नंदा कोल्हापूरहून, पुण्यातून मी, स्मिता आणि सरस्वती, पनवेलहून मीनल, जयू, सुलभा, संगीता, पेणहून कल्पना, अलिबागहून पूनम, ठाण्यातून नयन आणि उजू आणि चेंबूरहून राजश्री अशा तेरा जणी इंदूरच्या मोहिमेवर निघालो.

मजल दरमजल करीत सकाळी नऊ वाजता गाडी एकदाची इंदूर स्टेशनमध्ये शिरली. आम्ही ठरवलेली टेम्पो ट्रॅव्हलर ड्रायव्हर रितेश ठाकूरसह आमची वाटच बघत होती. तिथून मग आमचा गोकुळ होम स्टेच्या दिशेने प्रवास सुरु झाला. इंदूरमध्ये स्वच्छ इंदूरच्या जाहिराती जागोजागी झळकत होत्या आणि ते खरं पण होतं. खरंच इंदूर बाकीच्या शहरांच्या मानाने खूप स्वच्छ होतं. मोठे रस्ते, बीआरटीच्या सुंदर बसेस, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे. सगळ्यात नजरेत भरत होती ती जागोजागी असलेली स्वच्छतागृहे. पुण्यात काय किंवा पिंपरीचिंचवडमध्ये काय स्वच्छतागृहांची वानवाच आहे. मात्र येथे मुबलक स्वच्छतागृहे आहेत. हा पण फक्त एकच गोष्ट पुण्यापेक्षासुद्धा वाईट होती ती म्हणजे अत्यंत बेदरकारपणे दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार.

गोकुळ होम स्टेचे मालक श्री. व सौ. भागवत यांची ओळख झाल्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊन कांदेपोहे, सफरचंद, चहा कॉफीचा भरपेट आयता समोर आलेला नाश्ता करुन आम्ही निघालो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला म्हणजे महेश्वरला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकराच्या राजधानीच्या गावाला. अहिल्याबाई होळकर एक असामान्य स्त्री. वेळप्रसंगी स्त्री किती कणखर बनू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई. त्यांनी कायम प्रजाहिताचाच विचार केला. त्यांची स्वत:ची राहणी अत्यंत साधी पण आपल्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी प्रजाहिताच्या इतक्या मोठमोठ्या योजना राबवल्या की त्याची माहिती घेतली की थक्कच व्हायला होते. आणि त्यांचा अभिमान वाटण्यासाठी आणखी एक धागा आहे तो म्हणजे, त्या मूळच्या महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील चौंडी या गावच्या. या महाराष्ट्रकन्येने आपल्या मुत्सद्दीपणाने, दूरदृष्टीने मध्यप्रदेश या आपल्या सासुरवाडीची कायम भरभराट केली. महेश्वरच्या किल्ल्यातील अहिल्याबाईंच्या भव्य पुतळ्यासमोर आपोआपच नतमस्तक व्हायला होते. लोकहिताची मोठमोठी कामे करणा-या या देवीचा स्वत:चा वाडा तुलनेने इतका छोटा आहे की तिच्या साधेपणापुढे आपण आपोआपच नम्र होतो. वाड्यात असलेले पाच पानांचे बेलाचे झाड हा निसर्गाचा एक चमत्कारच. त्यानंतर दृष्टीस पडली ती पावनरुपा नर्मदामैंया. नर्मदे हरमधून भेटीस आलेली, आपल्या विस्तीर्ण पात्रासह साद घालणारी ती शांत, निवळशंख पाण्याने अखंड वाहणारी, आजूबाजूच्या गावांची क्षुधा तृप्त करणारी, त्यांना सुजलाम, सुफलाम बनवणारी, आपल्याच मस्तीत वाहणारी नर्मदा. तिच्या पाण्याची ओंजळ डोळ्यांना लावल्यावर जी काही शांतता वाटली ती अवर्णनीयच.

मग नावेत बसून नर्मदामैंयाशी गुजगोष्टी करायला निघालो. आपल्यात तालात वाहणा-या नर्मदेशी जणू आज आमचे नाते जुळले होते. ती जशी वाटेतल्या अडथळ्यांची पर्वा करत नाही तशाच आम्ही आज आपापले सगळे बंध,पाश, जबाबदा-या लांब ठेवून मुक्ता होऊन बाहेर पडलो होतो. आमचा आजचा ड्रेसकोड गुलाबी टॉप आणि जीन्स असा होता. येताना घाटावर एका ठिकाणी गर्दी दिसली म्हणून सहज चौकशी केली तेव्हा कळले की मिथुन चक्रवर्तीच्या कोणत्या तरी सिनेमाचे शूटींग चालू आहे. एकेकाळी मिथुनचे खूप पिक्चर बघितले होते. त्यामुळे त्याला बघण्याची उत्सुकता होती. पण अचानक बेदरकारपणे सिगरेट ओढणारा मिथुन समोर आला आणि मनातल्या प्रतिमेला एकदम तडा गेला. मग आम्ही सगळ्याजणी कल्ला करीत शिरलो ते महेश्वरच्या साड्यांच्या दुकानात. प्रत्येकीकडे भलीमोठी लिस्ट होती. दुकानात शिरल्यावर तिथल्या रंगीबेरंगी दुनियेत जणूकाही हरवूनच गेलो. अखेरीस नाईलाजाने परत इंदूरकडे निघालो. कारण अजून एक आकर्षण आमची वाट बघत होते, ते म्हणजे सराफा म्हणजे इंदूरची खाऊगल्ली.

दिवसा सराफगल्ली आणि रात्री खाऊगल्ली अशा जगप्रसिद्ध खाऊगल्लीत विविध चवीढवीच्या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. त्यात सगळ्यात आवडले ते मालपुवा विथ रबडी आणि अत्यंत नेमक्या चवीची साखर असलेले गरमागरम दूध आणि हो गराडू या विचित्र नावाचा पण आपल्याकडच्या कोनफळाशी साधर्म्य सांगणारा चटपटीत चवीचा पदार्थ आणि भुट्टेका कीस. रात्री भागवतकाका काकूंच्या गोकुळ होम स्टेला परतल्यावर पुन्हा सुरु झाल्या ब-याच वर्षांच्या साचलेल्या गप्पा, शाळेतल्या गमतीजमती. हळूहळू एकेकीचे डोळे मिटायला लागले आणि एरवी जिची आराधना करावी लागे ती निद्रादेवी आज प्रचंडच खूष असल्याचे जाणवले.

दुस-या दिवशी मस्तपैकी तयार होऊन निघालो ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घ्यायला. आधी सांगितल्यामुळे तिथे स्पेशल दर्शन मिळाले. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा आरती सुरु होती. त्यानंतर चक्क गाभा-यात जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घ्यायला मिळाले. आजकाल जास्त आनंद देखील सहन होत नाही सरळ डोळे भरुन येतात. त्या विश्वनियंत्यापुढे नतमस्तक होताना सगळ्या सुखदु:खांचा विसर पडला. जे काही मागायचे होते ते मनातच राहिले, फक्त सगळ्यांना सुखी ठेव एवढेच आठवत होते. तिथे सगळ्याजणींचा ग्रुप फोटो काढला. खूप मस्त वाटले. नंतर कालभैरवाच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. तिथे कालभैरवाला दारुचा प्रसाद दाखवतात. आता प्रथाच आहे मग काय आम्हीपण पूजेचे ताट घेतले. दुकानदाराने विचारले देशी की विलायती, दोन मिनिटे काही समजले नाही. नंतर लक्षात आले तो दारुच्या बाटलीबद्दल विचारत होता. मग काय देशी कशाला चांगली इंग्लिश घेतली आणि निघालो कालभैरवाच्या दर्शनाला. तिथे एका पसरट ताटलीत ती दारू ओततात आणि कालभैरवाच्या तोंडासमोर धरतात. आणि काय आश्चर्य ती दारू झरझर रिकामी होते. मग आमच्या चक्रधारीकडे चौकशी केल्यावर कळले की ती दारु नक्की कुठे जाते ते आजतागायत कळलेले नाही. खरंच ओ डार्लिंग ये है इंडिया…

त्यानंतर आमचा मोर्चा वळला तो दुस-या ज्योतिर्लिंगाच्या म्हणजे ओंकारेश्वराच्या दर्शनाला. तिथे पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. रस्ता बराच एकेरी आणि खराब होता. याठिकाणी दोन मंदिरात जावे लागते असे तिथे गेल्यावर कळले. ते म्हणजे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर. मग काय होडीवाल्यांनी गराडा घातलाच होता. त्यातल्याच एकाला पटवले आणि निघालो ओंकारेश्वराच्या दर्शनाला. इथे पण नर्मदा पार करत मंदिरात जावे लागते. मंदिराच्या वरच्या बाजूला नर्मदेवर खूप मोठा बांध दिसत होता. चौकशी केल्यावर कळले की ते धरण आहे. त्यामुळे मूळचे विस्तीर्ण पात्र आता रोडावले होते. पण आधी येथे नर्मदा किती विशाल असावी याचा अंदाज मात्र घेता येत होता. दहा मिनिटे नदीतून प्रवास केल्यावर दुस-या तीराला लागलो. थोड्या पाय-या चढून मंदिरात पोचले आणि समोर दृष्टीस पडली ती दगडातील अप्रतिम कलाकुसर. खरंच भारतीय मंदिरे एका दृष्टीने खूप अजोड आहेत. इथल्या कलाकुसरीने थक्क व्हायला होते. मोठमोठ्या कोरीव खांबांवर तोललेले हे मंदिर उत्कृष्ट कलाकुसरीचा एक बेजोड नमुना आहे.

मोठी रांग नसल्याने सहजगत्या ओंकारेश्वराचे दर्शन झाले. मंदिरातून बाहेर पडताना समोर एक मोठा सेतू दिसला. चौकशी केल्यावर कळले की जर तुम्हाला होडीतून यायचे नसेल तर या पुलावरुन मंदिरात येता येते. त्याच्या पलीकडे अजून एक पूल दिसला. तो पूर्वीचा होता. आता लक्ष होते ते ममलेश्वराच्या मंदिराकडे. परत नर्मदा पार करुन दुस-या तीरावर आलो. तिथे नर्मदामैंयाची सांजआरती सुरु होती. वाराणशीला चालणा-या गंगेच्या आरतीचा नोकझोक त्यात नव्हता. पण भाविक भक्तीभावाने आरती करत होते. खरंच जीवनदायिनीची नित्यनियमाने मनापासून करुणा भाकणे, आपल्या परंपरेने आपल्याला पंचमहाभूतांच्या ठायी नतमस्तक व्हायला शिकवले ते किती योग्य आहे याची मनोमन जाणीव झाली आणि आपोआपच हात जोडले गेले. ममलेश्वराच्या मंदिरात देखील कोरीव काम बरेच आणि देखणे होते. आता मात्र इंदूरचे वेध लागले. कारण आज छप्पनवर आक्रमण करायचे होते. काल सराफ्याला भेट देऊन झाली मग आज अपरिहार्यपणे छप्पनला जायलाच हवे. येथे छप्पन दुकाने आहेत म्हणून हे छप्पन.

आजही खूप दमणूक झाली असली तरी जाणवत नव्हती. कारण ट्रीपचे दोन दिवस खूपच सक्सेसफुल झाले होते. तिस-या दिवशी मांडवगडावर कूच करायचे होते. रुपसुंदर रुपमती आणि तिचा बाजबहादूर याबद्दल ब-याच कथा ऐकल्या होत्या. प्रत्यक्षात तिथे काय असेल याची प्रचंड उत्सुकता होती. दिवसभर प्रवास त्यानंतर छप्पनमधल्या वेगळ्या चवीच्या साबुदाणा खिचडीचा आस्वाद आणि त्यावर चार चांद लावायला मस्त कोल्ड कॉफी, हळूहळू विकेट पडायला सुरुवात झाली. आणि मग मस्त ताणून दिले. सगळ्याजणी सातवा आसमान पार करुन डायरेक्ट झोपेच्या अधीन.

दुस-या दिवशी मांडवगड उर्फ मांडूवर स्वारी. जाताना ठिकठिकाणी सोनसळी रंगाचा पिकलेला गहू, हरभरा, मधूनच उस दिसत होता. मध्यप्रदेश म्हणजे गव्हाचे कोठार. त्यातच माळवा म्हणजे कोणे एके काळी खपली गव्हासाठी प्रसिद्ध. मांडूच्या प्रवेशद्वारापाशीच गाइड मिळाला. त्याने एक वेगळीच माहिती दिली. तिथे आज भगोरिया हा उत्सव होता. त्यामुळे वाहतूक थोडी वेगळ्या बाजूने वळवली होती. मुख्य ठिकाणी पोचल्यावर तिथे मोठ्ठा बाजार भरलेला दिसला. सहजच कुतुहल म्हणून भगोरिया म्हणजे काय याची चौकशी केली. तेव्हा एक वेगळीच माहिती मिळाली. इथल्या आदिवासी जमातीत आजच्या दिवसाला फार मोठे महत्व असते. कारण आज लग्नाच्या गाठी बांधल्या जातात. येथे लग्नाळू मुलामुलींचे संमेलन भरते. एखाद्या मुलाला मुलगी आवडली की तो तिला रंग लावतो. मात्र जर त्या मुलीला तो मुलगा पसंत असेल तरच ती त्याला रंग लावते. मग घरचे वडीलधारे बोलणी करतात आणि लग्न जमते. पण जर मुलीला मुलगा पसंत नसेल तर जोरजबरदस्ती केली जात नाही. यावेळी ज्यांची लग्ने झाली आहेत असे सुद्धा दुसरे लग्न करण्यासाठी उपस्थित राहून लग्न जमवू शकतात. सगळा आपखुशीचा मामला. पण हा इथे स्त्रीला आपल्या जीवनसाथीची निवड करण्याचा हक्क आहे. जो शहरी सो कॉल्ड सुशिक्षितांमध्ये दुर्दैवाने नाहीये. परत ओ डार्लिंग ये है इंडिया…

मांडवगडावर रुपमतीमहल, बाजबहादूर महल, जहाज महल, हिंदोला महल असे एकाहून एक स्थापत्यशैलीचे वेगवेगळे आविष्कार बघितले. नर्मदेची भक्त असणारी गानलुब्धा रुपमती तिचे दर्शन घेण्यासाठी उंच अशा महालात येत असे. तिथून तिला दूरवर नर्मदेची चमचमची रेषा दिसत असे. बाजबहादूर देखील सुरांचा उपासक, मग त्यांची दोघांची जुगलबंदी रंगत असे तो घुमट बघितला. इथेच त्यांची गाण्याची स्पर्धा चालत असे. शास्त्रीय भाषेत ज्याला अॅकॉस्टिक असलेला महाल असे म्हणता येईल तो महाल म्हणजे चमत्कारच आहे. एका घुमटात बसून आपण जर गायले तर त्या समोरच्या घुमटात ते गाणे अत्यंत सुरेलपणे ऐकू येते. मजाच होती. एकेकाळी परमार राजांचा राजदरबार, पण आता जामा मशीद म्हणून ओळखली जाणारी वास्तू पाहिली. त्यानंतर तिथला शासक गियासुददीन खिलजीचा महाल पाहिला. त्याच्या म्हणे पंधराशे राण्या होत्या. मग त्यांचा हमाम, त्यांचे महाल पाहिले.

भारतातील सर्वात मोठा भुईकोट म्हणून ओळखला जाणार मांडवगड खरंच अप्रतिमच आहे. इथे गोरखचिंचेची खूप झाडे दिसली. ठिकठिकाणी त्याची थोडाशी आंबट चिंचेसारखा गर असलेली मोठीमोठी फळे विकण्यासाठी ठेवलेली होती. खरंतर मांडूचे वर्णन इतक्या कमी शब्दात होऊच शकत नाही. त्यासाठी तिथे प्रत्यक्ष जायला हवे. असं म्हणतात की पौर्णिमेच्या चांदण्यात मांडवगडाचे सौंदर्य आणखीन खुलून येते. आमच्या गाईडकडे चौकशी केली तेव्हा त्याने रात्री येता येत नाही असे सांगितले. मग रुपमती आणि बाजबहादूराची ती प्रेमकथा मनातच राहिली. पौर्णिमेच्या रात्री येण्याचे मनातले मांडे मनातच राहिले. आणि परत इंदूरला प्रयाण. पण मनात मात्र त्या खिलजीच्या पंधराशे राण्या आणि भगोरियामधली लग्नेच होती.

अखेर आमच्या ट्रीपचा शेवटचा दिवस जवळ आला होता. उद्या इंदूरदर्शन आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे खरेदी तेवढीच बाकी होती. रविवारी इंदूरची कपड्याची बाजारपेठ बंद असते असे आधीच कळले होते. त्यामुळे खरेदी फक्त मिठाई आणि नमकीनची करायची होती. मग इंदूरचा पॅलेस, काचमंदिर, गणेशमंदिर बघितले. येताना आम्ही तिघीजणी पुण्याला बसने येणार होतो. बाकीच्या सगळ्याजणी विमानाने मुंबईला जाणार होत्या. आमची बस लवकरची असल्याने आम्हाला स्टॉपवर सोडून बाकीच्या एअरपोर्टला गेल्या. जाताना पावले जड झाली होती. घराची आठवण येऊ लागली होती. पण चार अविस्मरणीय दिवसांची भरभक्कम शिदोरी गाठीशी बांधून परत असेच फिरण्यासाठी भेटण्याचे वायदे करुन झाले होते. पण त्यात एकच दुरुस्ती होती, ती म्हणजे यावेळी नव-यांनादेखील घेऊन यायचे ठरले होते.

"Indore"

"Maheshwar

"Indore

"Mandu"

"Maheshwar

"Ashrafi

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.