Pimpri : पावसाळा सुरु होतोय, वृक्षारोपणाचे नियोजन करायला हवं !

एमपीसी न्यूज – मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. हवामान खात्याने येत्या एक-दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचेही संकेत हवामान खात्याने दिले आहेत. यावरुन पाऊस लवकरच सुरु होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाला जपण्यासाठी तसेच हिरवाईचे आच्छादन वाढविण्यासाठी पावसाळ्यात वृक्षारोपण करायला हवं. परंतु झाडे लावताना थोडा विचार करायला हवा. कुठेही कोणतीही झाडे लावणं संयुक्तिक नसून योग्य ठिकाणी योग्य झाडे लावायला हवीत.

कोणती झाडे कुठे लावावीत, याबाबत पक्षीतज्ज्ञ व पर्यावरणाचे अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार वड, उंबर, पाखर, नांद्रुक, पिंपळ या वृक्षांना जीवनदायी वृक्ष म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ही झाडे सर्वत्र लावता येतील. तर बकाणा, भेंडी, पांगारा, आकाशनिंब (बुच), महारुख, शाल्मली (सावर), कदंब ही जलदगतीने वाढणारी झाडे आहेत. बोर, चिंच, आवळा, मोहा, टेंभुर्णी, खिरणी, शिवण, जांभूळ, नारळ, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ, फणस, लिंबू, पेरू, चारोळी आणि आंबा ही फळझाडे आपण विविध ठिकाणी लावू शकतो. तसेच खालील प्रकारची झाडे, त्यांच्या उपयोग व स्थाननिश्चितीप्रमाणे लावता येतील –

# मंदिराभोवती लावण्यासाठी योग्य झाडे – वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडुनिंब, कांचन
# रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी योग्य झाडे – कडुनिंब, सप्तपर्णी, करंज, वरवंटा (सॉसेस ट्री), जारूळ, अमलतास, वड, उंबर, पाखर, नांद्रुक, पिंपळ, चिंच, शिसव, शिरीष
# उद्यानात लावण्यासाठी योग्य झाडे – पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा), जारूळ, चाफा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, सप्तपर्णी, बदाम, सीता अशोक, कदंब
# शेताच्या बांधावर लावण्यासाठी योग्य झाडे – खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हातगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कडुलिंब
# शेताच्या कुंपणाला लावण्यासाठी योग्य झाडे – सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी (हिंगण बेट), घायपात, जेट्रोफा (वन एरंड)
# वनशेतीसाठी उपयुक्त झाडे – आवळा, अंजीर, चिंच, फणस, खिरणी, खजूरिया शिंदी, तुती, करवंद
# शेतजमिनीची सुपीकता वाढवणारी झाडे – उंबर, करंज, ग्लिरिसिडिया, शेवरी
# घराभोवती लावण्यासाठी योग्य झाडे – रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब
# कालव्याच्या काठावर लावण्यासाठी योग्य झाडे – वाळुंज (विलो), ताडफळ
# रस्त्याच्या मधील भागात लावण्यास उपयुक्त झाडे – कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, निवडुंग ही झाडे वाहनांमधून निर्माण होणा-या वायूचे शोषण करून परिसर स्वच्छ ठेवतात.
# हवेतील प्रदूषण दर्शविणारी झाडे – हळद, पळस, चारोळी आदी. हवेतील प्रदूषण मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास या झाडांची पाने, फुले, साल, फळे यामध्ये विकृती निर्माण होते.
# धूलिकण व विषारी वायूपासून संरक्षण करणारी झाडे – वड, उंबर, पाखर, नांद्रुक, पिंपळ, आंबा, अशोक, बकुळ, रेन ट्री (वर्षा वृक्ष), जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस
# हवा स्वच्छ ठेवणारी झाडे – वड, उंबर, पाखर, नांद्रुक, पिंपळ, थुजा, पळस, सावर (शाल्मली), कदंब, गुलमोहर, अमलतास
# औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण कमी करणारी झाडे – पिंपळ, पेल्टोफोरम, पुत्रजीवी, उंबर, अशोक (उंच व पसरणारा), शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, अमलतास, पेरू, बोर, कडुनिंब, आवळा, चिंच, कदंब, बेल
# बारा तासापेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी झाडे – वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक, कडुनिंब, कदंब
# औषधी झाडे – हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, करंज, रिठा, निरगुडी, शिवन, टेंटू
# सरपणासाठी योग्य झाडे – देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू, सुरु

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.