Nigdi : प्राधिकरणात भरदिवसा अडीच लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण भागात भरदिवसा घर फोडून अडीच लाखांचे सोने लंपास केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 5) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्राधिकरणातील सेक्टर नंबर 27 मध्ये घडला.

विजयकुमार अनंतपूर (वय 54, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार प्राधिकरणातील सेक्टर नंबर 27 अ मध्ये व्हिला बिल्डिंगमध्ये राहतात. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते आपल्या फ्लॅटला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले. दुपारच्या वेळी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले दोन लाख 49 हजार 600 रुपयांचे सोने घेऊन चोर पसार झाला.

विजयकुमार कामावरून सायंकाळी सहाच्या सुमारास आले. घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरात जाऊन बघितले असता, त्यांच्या घरातील अडीच लाख रुपयांचे सोने गायब असल्याचे निदर्शनास आले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.