Sangali News: आमदार महेश लांडगेंचा “गनिमी कावा”, सांगलीत अखेर बारी झालीच

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार महेश लांडगे यांची “गनिमी कावा” करीत अखेर “बारी” केली. सांगलीत प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला असतानाही सांगली येथे बैलगाडा शर्यत आयोजित केली आणि यशस्वीही करण्यात आली.

सांगली येथील जरे गावात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. राज्यातील विविध ठिकाणाहून बैलगाडाप्रेमी सांगलीत दाखल झाले होते. मात्र, स्पर्धेचे आयोजक आमदार गोपिचंद पडळकर यांना पोलिसांनी नजरकैद केले होते. त्यामुळे पडळकर शर्यतीच्या ठिकाणी पोहचू शकले नाहीत. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी “गनिमी कावा” करीत शर्यतस्थळी पोहोचले. सुमारे 25 किलोमीटर दुचाकी आणि पायी प्रवास करीत लांडगे यांनी पोलिसांना चकवा दिला. काहीवेळानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली.

दरम्यान, बैलगाडा प्रेमी आणि पोलिसांमध्ये काहीशी वादावादीही झाली. पोलिसांनी केलेले आवाहन बैलगाडा मालकांनी धुडकावले.

आमदार लांडगे म्हणाले की, ही स्पर्धा भरवल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास आला की, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होवू शकतो. न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या पाहिजेत. शेतकऱ्यांची गाय, बैल कसायाला न देता सांभाळली पाहिजेत. परंपरा जपली पाहिजे. कायदेशीर लढाई आमची सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा बनवण्याची मान्यता दिली. राष्ट्रपती महोदयांनी स्वाक्षरी करुन मान्यताही दिली. बैल हा प्राणी संरक्षित प्रवर्गातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. न्यायालयीन लढाई लढत आहोत. शेतकऱ्यांमध्ये विश्वास जागवण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.