Sangavi Crime News : दोन वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा ; आरोपी अटकेत

गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी

एमपीसी न्यूज – प्रेयसीला पळवून घेऊन जाणा-या इसमाचा पत्ता न सांगणा-या व्यक्तीचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह मुंबई-बंगळुरू हायवेवरुन मुळा नदीच्या पात्रात फेकून दिला होता. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलाकडून माहिती घेत तपासाअंती या खुनाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट चारने ही कामगिरी केली.

आरीफ सिद्दीक शेख (वय 32, रा. थेरगाव, पुणे), सागर सुरेश जगताप (वय 30, रा. थेरगाव, पुणे), सुरज उर्फ सोन्या अरविंद जगताप (रा. देहूरोड) व चेतक नेपाळी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या घटनेचा एक अल्पवयीन मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. खुन झाल्यानंतर मयताच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यात आल्याने सदर गुन्ह्याचा प्रकार उघडकीस आला नव्हता. त्या बाबत अल्पवयीन मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खालील माहिती दिली.

अल्पवयीन मुलाच्या बहिणीचे आरीफ शेख या गुन्हेगाराशी प्रेमसंबंध होते. आरीफ जानेवारी ते मे 2019 दरम्यान जेलमध्ये होता. त्यावेळी त्याची बहिण देहूरोड येथील एका पुरुषासोबत मुंबईला पळून गेली. आरीफ शेख हा जेलमधून बाहेर आल्यानंतर, त्याने मुंबई येथे गेलेल्या इसमाचा पत्ता माहिती करुन घेण्यासाठी त्याच्या साथिदारांसह जुलै 2019 मध्ये धीरज नांगर या इसमाचा गळा दाबून खून केला. व त्याचा मृतदेह मुंबई बंगळुरू हायवेवरुन मुळा नदीच्या पात्रात फेकून दिला होता. झालेला प्रकार कुणालाही सांगितला तर तुला जीवे मारीन, अशी धमकी अल्पवयीन मुलाला आरोपींनी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार आरोपी आरीफ सिद्दीक शेख व सागर सुरेश जगताप हे जेलमध्ये असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर आरोपी सुरज उर्फ सोन्या अरविंद जगताप याचा शोध घेऊन त्याला देहूरोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा युनिट चारचे अधिकारी व कर्मचारी यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी जुलै 2019 मध्ये आरीफ, सागर, चेतक नेपाळी असे चौघांनी धिरज नांगर यांचा खून केल्याची कबुली दिली.

माहिती न दिल्याने गळा दाबून खून करून मृतदेह नदीत फेकला

आरोपींनी धीरज नांगर या इसमास कान्हे फाटा येथून उचलून, मुंबई-बंगळुरू हायवे वरील भुजबळ चौक याठिकाणी आणले. याठिकाणी चेतक नपाळी काम करत असलेल्या एका भांगाराचे दुकानात नेऊन त्याला दारू पाजली व मारहाण करुन आरीफच्या प्रेयसीला पळवून नेणाऱ्या इसमाचा पत्ता विचारला. इसमाने पत्ता न सांगितल्याने त्याचा चौघांनी गळा दाबुन खून केला होता. त्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे काढून फक्त अंडरपेंट ठेवुन मृतदेह भुजबळ चौकानजीक असणाऱ्या मुळा नदीच्या पुलावरुन नदीत फेकून दिला होता.

सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे निलख, विशालनगर येथे मुळा नदीच्या किनाऱ्या लगत ऑगस्ट 2019 मध्ये मृतदेह सापडला असल्याचे आढळून आले. मृतदेह संपूर्ण कुजलेला असल्याने त्याची ओळख पटली नव्हती. त्यानंतर धीरज नांगर यांचे नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना मृतदेहाचे फोटो दाखविला असता तो मृतदेह धीरज याचाच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

अटक आरोपी सराईत गुन्हेगार

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. आरीफ सिद्दीक शेख या आरोपीवर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तो सध्या खुन, खंडणी तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. सुरज अरविंद जगताप या आरोपीवर एकूण 20 गुन्हे दाखल असून तो पूर्वी एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात सात वर्षे शिक्षा भोगून आलेला आहे. तसेच, सागर सुरेश जगताप या आरोपीवर 12 गुन्हे दाखल असून तो खंडणीच्या गुन्ह्यात सध्या जेलमध्ये आहे.

या आरोपींवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.