Sangavi : पवनाथडी जत्रेत खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने  महापालिकेतर्फे 4 ते 8 जानेवारी दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसाच्या जत्रेत खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सांगवीतील पी.डब्लू.डी. मैदान येथे 4 ते 8 जानेवारी दरम्यान होणा-या जत्रेचे शुक्रवारी सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत या जत्रेत महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी पालिकेतर्फे दर वर्षी पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. जत्रेचे हे 12 वे वर्ष आहे.

जत्रेत  शाकाहारी खाद्यपदार्थांचे 247 आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे 205 स्टॉल्स असणार आहेत. तर, वस्तू विक्रीचे 361 स्टॉल असणार आहेत. याबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील आहे.  शुक्रवार (दि. 4) सायंकाळी पाच वाजता म्युजिक मेलेडी हिंदी मराठी नृत्यगीतांचा कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता ‘गर्जा हा महाराष्ट्र’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार (दि. 5) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम व सायंकाळी सात  वाजता ‘लावण्य दरबार’ हा लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

रविवार (दि. 6)सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सारेगमप कलाकार यांचा व सायंकाळी सात  वाजता ‘बॉलीवूड स्टार्स’ , हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल हा कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता  धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता गायन,वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवार ( दि. 8 ) सायंकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ( I Love My India ) तर सायंकाळी सात वाजता कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीते या कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे.

हे कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमास जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.