Scholarship News : राज्यातील 32 हजार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठी 50 कोटींची आवश्यकता

एमपीसी न्यूज – राज्यातील पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत (Scholarship News)उत्तीर्ण झालेल्या 32 हजार 667 शिष्यवृत्तीधारकांना शिष्यवृत्तीची रक्कम नवीन दराने वितरित करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी यावर्षी 49 कोटी 94 लाख 50 हजार रुपये आवश्यक असून, राज्य शासनाकडून मिळालेल्या 19 कोटी रुपयांचा निधी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे.

राज्यात पाचवीसाठी 16 हजार 683, तर आठवीसाठी 16 हजार 258 विद्यार्थी (Scholarship News)संचसंख्या आहे. पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी ते आठवी शिक्षण घेणाऱ्या एकूण 50 हजार 49 विद्यार्थ्यांना, तर आठवीच्या परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या 32 हजार 516 विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीला शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्यावर्षीपर्यंत पाचवीला कमाल एक हजार रुपये, आठवीला दीड हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती.

PCMC : महापालिकेत शासनाचे अधिकारी झाले उदंड !

यावर्षीपासून शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून पाचवीला पाच हजार रुपये, आठवीला 7 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदापासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे. 2023-24 मध्ये एकूण 40 कोटी 40 लाख फक्त रुपये शिष्यवृत्तीसाठी मंजूर आहेत.

तर 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी रक्कम 49 कोटी 94 लाख 50 हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरुन 19 कोटी 39 लाख 19 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सातवी, आठवी आणि दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वाढीव दराने शिष्यवृत्ती पहिल्यांदाच वितरित करण्यात येत असल्याचे योजना विभागाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

 

बँक खात्याची अचूक माहिती आवश्यक

परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर योजना शिक्षण संचालनालयाकडून शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर केले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती प्राप्त होत नसल्याने शिष्यवृत्ती वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. 2021 पर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम न मिळालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडे द्यावी.

ही माहिती www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडून अद्ययावत झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यात येईल. तर 2021 नंतरच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www. mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूकपणे भरणे आवश्यक आहे. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.