Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख -10 – विक्रमी फलंदाज विनोद कांबळी

एमपीसी न्यूज : त्याच्याकडे अफाट प्रतिभा होती. जगातल्या कुठल्याही मोठ्या (Shapit Gandharva) गोलंदाजाला भिरकावून देण्याची धमक त्याच्या मनगटात आणि काळजातही होती. त्याने पदार्पणातल्या आपल्या तिसऱ्याच सामन्यात ‘द्विशतकी’ खेळी करून अशी खेळी करणारा पहिला तरुण भारतीय’ हा विक्रम नोंदवला.

त्यानंतरच्या पुढच्याच सामन्यात आणखी एक द्विशतकी खेळी करून असा विक्रम करणारा पहिला डावखुरा फलंदाज’ हा बहुमान पटकावला. त्याने श्रीलंका संघाविरुद्ध आणखी एक शतक करून ‘तीन वेगवेगळ्या देशाविरुद्ध कसोटी शतक करणारा पहिला खेळाडू’ हा सुद्धा बहुमान पटकावला. त्याने या धडाकेबाज खेळामुळे ‘अतिशय जलदगतीने 1000 धावा करणारा जगातला पहिला फलंदाज’ असा आणखी एक विक्रम केला.

मात्र, एवढे करूनही त्याची कसोटी कारकीर्द देदीप्यमान न ठरता अतिशय अल्प काळाची अन क्षणभंगूर पण कायमस्वरूपी वादग्रस्त अशीच ठरली.

‘विनोद गणपत कांबळी’ हे नाव वाचले की वरील (Shapit Gandharva) सर्व मुद्दे मनाला तंतोतंत पटतात. त्या विनोद कांबळी ऊर्फ शापित गंधर्वाची एकंदरितच कारकीर्द अतिशय खळबळजनक पण तितकीच वादग्रस्त अशी ठरली. 18 जानेवारी 1972 साली जन्मलेल्या विनोदचे वडील एक गिरणी कामगार होते. मुंबईच्या इंदिरा नगर, कांजूरमार्ग येथे जन्मलेल्या विनोदचे बालपण अतिशय सामान्य असे होते. मात्र, त्याचे नाव क्रिकेट जगतात तेव्हा सर्वदूर झाले, जेव्हा त्याने हॅरीस शिल्ड स्पर्धेत शारदाश्रम शाळेकडून खेळताना सेंट झेवीयर्स संघाविरुद्ध 664 धावांची नाबाद आणि विक्रमी भागीदारी केली होती, ज्यात त्याने नाबाद 349 धावा ठोकल्या होत्या अन् या विक्रमी भागीदारीतल्या त्याच्या त्या जोडीदाराचे नाव होते ‘सचिन रमेश तेंडुलकर’ जो पुढे ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला गेला आणि जगभर प्रसिद्धही झाला.

मात्र, या अविस्मरणीय खेळीमुळेच विनोद आणि सचिनसह त्यांचे गुरू रमाकांत आचरेकर हेही (Shapit Gandharva) एकाच रात्रीत प्रकाशझोतात आले. असे सांगितले जाते, की या भागीदारीच्या दरम्यान संघाच्या कर्णधाराने डाव घोषित करण्याची दिलेली सूचना या दोघांनी वारंवार दुर्लक्षित करून मैदानावर तळ ठोकला होता!  याच सामन्यात विनोदने गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवताना विरोधी संघाचे  6 गडी बाद करत आपल्या दर्जाची एक मोठी झलक दाखवली होती. यामुळेच त्याचे नाव एकदम प्रकाशात आले.

मात्र, त्याच्या आधी त्याचा बालपणीचा सवंगडी सचिनला पाकिस्तानविरुद्धच्या (Shapit Gandharva) मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले आणि विनोदला मात्र त्यासाठी पुढील दोन वर्षे वाट बघायला लागली खरी; पण त्या वाट बघण्याचे चीज तेव्हा झाले, जेव्हा त्याला भारतीय संघात इंग्लडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले. मालिकेतल्या तिसऱ्याच सामन्यात विनोदने वानखेडे मैदानावर 227 धावांची विशाल खेळी करून ‘भारतीय संघाकडून सर्वात कमी वयात एवढी मोठी खेळणारा पहिला तरुण भारतीय फलंदाज’ हा बहुमान पटकावला, तर त्यानंतरच्या दुसऱ्याच सामन्यात झिम्बाब्वे संघाविरुद्ध 224 धावा ठोकून ‘सलग दोन द्विशतके करणारा जगातला पहिला डावखुरा फलंदाज’ होण्याचा विक्रम केला. त्यानंतर त्याने श्रीलंका संघाविरुद्ध  आणखी एक शतक करत ‘तीन वेगवेगळ्या कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध शतक करणारा पहिला फलंदाज’ होण्याचा विक्रम आपल्या नावावर करत आपल्या कारकिर्दीचा धडाकेबाज श्रीगणेशा केला.

त्याच्या धडाकेबाज खेळाचा आवेग असा होता, की त्याने जगातल्या सर्वात जलदगतीने कसोटी 1000 धावा करत आपल्या नावावर आणखी एक विक्रम केला. विनोदचा असा धडाका चालू असल्याने त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. कदाचित हेच यश त्याला पचवता आले नाही अन् त्याचे नाव खेळापेक्षाही इतर गोष्टीसाठी गाजू लागले. चित्रविचित्र हेअरस्टाईल करणे, कानात डूल घालणे, संघातल्या सहकारी खेळाडूंसोबत त्याची भांडणे- अशा नको त्या गोष्टी जास्त प्रमाणात चर्चेत येऊ लागल्या आणि त्याच्या कारकिर्दीला कुणाची तरी दृष्ट लागली; कारण फ़क्त वयाच्या 24 व्या वर्षी अखेरची कसोटी खेळल्यानंतर त्याला पुन्हा कधीही कसोटी संघात स्थान मिळवता आले नाही.

8 नोव्हेंबर 1995 साली न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला गेलेला कसोटी सामना त्याचा अखेरचा सामना ठरला. त्याने फक्त 17 कसोटी सामने खेळले, ज्यात चार शतके (ज्यात दोन द्विशतके होती) आणि तीन अर्धशतक होते. त्याने जवळपास 70 च्या सरासरीने सर्वांत जलदगतीने 1000 धावा केल्या होत्या, ज्या क्रिकेटच्या भल्या-भल्या रथी-महारथीनाही करता आल्या नव्हत्या. आजही तो विक्रम अबाधित आहे. मात्र इतकी चांगली सरासरी असतानाही, त्याचा खेळ उत्तम होत असतानाही त्याला अकालीच संघातले स्थान गमवावे लागले. त्याची फार मोठी किंमत त्याला चुकवावी लागली.

त्याने एकदिवसीय सामन्यातही आपला धडाकेबाज (Shapit Gandharva) खेळ चालू ठेवला. त्याने शारजा येथील विल्स स्पर्धेत 1991 साली पाकिस्तान संघाविरुद्ध पदार्पण केले. या स्पर्धेतल्या एका सामन्यात तो सलामीला आला, तेव्हा त्याने इम्रान खान, वसीम अक्रम अशा खतरनाक गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत आपण ‘लंबी रेस का घोडा’ आहोत, हे सिद्ध केले. इंग्लड संघाविरुद्ध 1993 साली जयपूर  येथील एकदिवसीय सामन्यात त्याने आपल्या वाढदिवशी शतक करून ‘अशी  खेळी करणारा जगातला एकमेव फलंदाज’ हा बहुमान पटकावत हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्याने 104 एकदिवसीय सामने खेळून  2,477 धावा केल्या, त्यामध्ये दोन (Shapit Gandharva) शतके आणि 14 अर्धशतके सामील होती.

मात्र, त्यानंतरही त्याचे संघातले स्थान कधीही पक्के नव्हते. त्याने एक- दोन वेळा नाही, तर तब्बल तेरा वेळेस संघात पुनरागमन करत आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने दोन वेळा विश्व कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.1996 सालच्या श्रीलंका संघाविरुद्धचा कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या उपांत्य सामन्याला कोणता क्रिकेटप्रेमी विसरेल? 1 बाद 98 अशा मजबूत स्थितीत असताना आपल्या संघाची आजही अनाकलनीय वाटणारी घसरगुंडी उडाली आणि भारतीय संघ 1 बाद 98 वरून 8 बाद 117 अशा कठीण परिस्थितीत आला.

यावेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी प्रचंड नाराज होत हुल्लडबाजी केल्याने सामना श्रीलंका संघाला बहाल करण्यात आला, त्यावेळी अक्षरशः हमसून- हमसून रडत परत येतानाचा विनोदचा चेहरा पाहून अनेकांना त्यावेळी अश्रू अनावर झाले होते. त्याच विनोदने नंतर एका खासगी चॅनेलवर मुलाखत देताना सामना फिक्सिंगचा आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली होती.

विनोदची कारकीर्द अशा पद्धतीनने बहरता- बहरताच अचानकपणे कोमेजली. त्यातच या दरम्यान भारतीय संघात गांगुली, द्रविड, लक्ष्मण असे एकापेक्षा एक गुणवंत खेळाडू आले आणि त्यांनी आपल्या जोरदार खेळाने संघातले स्थान पक्के करत विनोदच्या उरल्या-सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. याचाच परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. त्याने पुण्याच्या ब्ल्यु  डायमंडमध्ये नोकरी करणाऱ्या नोएला लेविसबरोबर लग्न केले होते; मात्र दोन वर्षातच ते लग्न मोडले.  त्यानंतर त्याने मॉडेल आंद्रेला हेवीटसोबत दुसरे लग्न केले. तिच्यापासून त्याला एक मुलगा झाला आहे.

क्रिकेटशिवाय त्याने आपले नशीब हिंदी सिनेसृष्टीत आजमावून बघितले; पण यात मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने टीव्ही मालिकेतही  नशीब आजमावले; पण इथेही त्याच्या वाट्याला निराशाच आली. त्याने समालोचनही करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही तो अपयशीच  ठरला. त्याने विधानसभेची निवडणूकही लढवली; मात्र इथेही यश त्याच्यापासून दूरच होते. याच दरम्यान त्याने कंटाळून आपली निवृत्ती जाहीर केली. मध्यंतरी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला; मात्र त्यातून तो सहीसलामत वाचला आणि आता नुकताच तो काही दिवसांपूर्वी आपल्याला काही तरी काम मिळावे म्हणून याचना करताना दिसला, ज्यामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. ज्यांनी त्याची देदीप्यमान  कामगिरी बघितली होती, त्यांना हे ऐकून प्रचंड मोठा धक्का बसला. त्याचा बालपणीचा मित्र यशाची एकेक शिखरे सहज पादाक्रांत करूनही विरक्तपणे तटस्थ राहिला, अन इकडे विनोद यशाचे एकेक हिमनग गाठल्यानंतर तिथून त्याचा पाय घसरल्याने त्याचा झालेला कपाळमोक्ष बघून त्याचे चाहते दैवाच्या विचित्र आणि कोणालाही न कळणाऱ्या अतर्क्य खेळाचा अर्थ आपापल्या परीने काढू लागले!

अतिशय सामान्य कुटुंबातील विनोदला मिळालेल्या यशामागे नक्कीच त्याचे कर्तृत्व होते, तर मग त्याच्या झालेल्या अधःपतनामागे त्याच्या डोक्यात शिरलेल्या यशाची नशा होती का? असा प्रश्न डोक्याचा भुगा केल्याशिवाय राहत नाही. यश मिळवणे फार अवघड नाही, तसे ते मिळालेले आकस्मिक यश टिकवणेही सोपे नाही, हेच खरे.

विनोदला परमेश्वराने इतकी अफाट प्रतिभा देऊनही ती टिकवण्यासाठीचे धैर्य आणि चिकाटी का दिली नाही, हे तो परमेश्वरच जाणो. आपल्या हातात त्याबद्दल काहीही नसले, तरी किमान विनोदचे उर्वरित आयुष्य तरी आनंदी आणि समाधानाचे जावो, इतकीच प्रार्थना आपण त्या सर्वसाक्षी परमेश्वराकडे नक्कीच करू शकतो ना? मी तरी तशी प्रार्थना करणार आहे. तुम्हीही करा. कराल ना?

– विवेक कुलकर्णी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.