Shirgaon Murder Update : सरपंच गोपाळे खून प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय 47) यांचा शनिवारी (दि. 1) रात्री साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर निर्घृणपणे खून करण्यात (Shirgaon Murder Update)आला. त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्यात दिसणाऱ्या तिघांना शिरगाव पोलिसांनी मंगळवारी (दि. 4) पहाटे अटक केली. यापूर्वी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण समोर आले नाही. सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25), संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय 31),  ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22, तिघे रा. शिरगाव, ता. मावळ ), महेश पोपट भेगडे  (वय 41, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे), अशोक लक्ष्मण कांबळे ( वय 53, रा. कांब्रे नामा, ता. मावळ), मनेश  देवराम ओव्हाळ (वय 42, रा. जांभूळ, ता. मावळ), अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय 38, रा. डॅफोडील सोसायटी, सोमाटणे फाटा, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत.

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं- चंद्रकांत पाटील 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रवीण हे त्यांच्या दुचाकीवर (एमएच 14/ एफझेड 7080) प्रति शिर्डी साई मंदिराच्या समोर रस्त्याच्या बाजूला बसले होते. त्यावेळी तिघांनी कट रचून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून केला. याबाबत सरपंच प्रवीण गोपाळे यांचे बंधू रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी रवींद्र यांनी काही स्थानिक व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 2) चौघांना अटक केली. त्यांना गुरुवार (दि. 6) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 4) पहाटे शिरगाव पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मुख्य तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना सोमवार (दि. 10) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांचा खून केल्याचा संशय त्यांचे भाऊ फिर्यादी रवींद्र यांनी व्यक्त केला होता. मात्र अद्याप पोलीस तपासात नेमके कारण समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलीस (Shirgaon Murder Update) निरीक्षक वनिता धुमाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.