Talegaon : प्रामाणिक सुरक्षा रक्षकामुळे हरवलेली हॅन्डबॅग मिळाली परत

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील विश्वास देशपांडे यांची हॅन्डबॅग नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात विसरली. महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने ती सांभाळून ठेवली व ती बॅग परत देशपांडे यांना परत केली. सर्वत्र चो-यांचे प्रमाण वाढत असताना असा प्रामाणिकपणा दाखविणे म्हणजे पाण्यासाठी आसुसलेल्या वाळवंटात एखादे हिरवेगार झुडूप अशी भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.

विश्वास देशपांडे रविवार (दि. 26) रोजी आपल्या मित्राच्या मुलाला CAT परीक्षेसाठी तळेगाव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात सोडण्यासाठी गेले. त्यावेळी जॅकेट बदलत असताना खांद्यावर अडकवलेली हॅन्डबॅग खाली ठेवली. ती विसरून तिथेच राहिली. खांद्यावरची हॅन्डबॅग कधीही खाली न ठेवणारे देशपांडे यांच्या ही बाब घरी आल्यानंतर लक्षात आली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर नूतन महाविद्यालयात चौकशी केली असता, सुरक्षा रक्षकाला (सुमित पटेल) ती बॅग सापडली असून त्याने ती जपून ठेवली असल्याचे समजले.

बॅगमध्ये बँकांचे डेबिट कार्ड, पैशाचे पाकीट, रोख रक्कम आणि ड्रायव्हिंग लायसन्स होते. सुमित पटेल याने बॅगची ओळख पटवून ती बॅग देशपांडे यांच्या मित्राकडे देऊ केली. बॅगमधील सर्व वस्तू जशाच्या तशा असल्याचे पाहून देशपांडे यांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली. सुमित पटेलच्या प्रामाणिकपणाबद्दल काही रक्कम बक्षीस म्हणून दिली. परंतु ती रक्कम त्याने स्वीकारली नाही. उलट हे माझे कर्तव्य आहे, असे बजावून सांगितले. तसेच ‘यापुढे तुम्हाला एखादी बॅग किंवा वस्तू सापडल्यास ज्याची आहे त्याला परत करा’ असा संदेशही त्याने दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.