Talegaon : ‘गुलजार’ यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सर्वांगाने वेध घेणारा ‘ जय हो ‘ हा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – ‘कलापिनी फिल्म क्लब’तर्फे शेजार ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनंतराव चाफेकर सभागृहात, ‘गुलजार’ यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सर्वांगाने वेध घेणारा ‘जय हो’ हा कार्यक्रम डॅा. अनंत परांजपे यांनी प्रभावीपणे सादर केला. 

सम्पूर्ण सिंह कालरांचे (गुलजार यांचे मूळ नाव) गुलजार होण्यापासून ते अगदी परवाच्या राझी चित्रपटापर्यंतचा सारा प्रवास त्यांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या, निर्मिती केलेल्या निवडक चित्रपटांच्या क्लिपिंग्सच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण निवेदनातून डॅाक्टरांनी आपल्या खास संवादी शैलीत रसिकांसमोर अलगद उलगडत नेला. चित्रपट कसा पहावा? त्यांची सौंदर्यस्थळं कोणती? चित्रपटांचं मनात खोल झिरपणारं मर्म पोचवण्याचं दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचं कसब, त्यांची आशयसंपन्न कविता, गाणीयांच्या बहारदार सादरीकरणामुळे आधीच्या पिढीच्या स्मृतिंना उजाळा तर मिळालाच परंतु, नव्या पिढीलाही गुलजारांच्या शब्दांची आणि शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्यापलिकडले ची अनुभूती कार्यक्रमातून मिळाली. 

स्वा. सावरकर, कुसुमाग्रज, आणि गुलजार या तीन महाकवींमधलं साम्य, मानवी मनातल्या अबोध पातळीवरच्या गूढांचा शोध घेण्याची वृत्ती, त्याचबरोबर वास्तवाचं भान आणिते कलाकृतींतून मांडण्याचं कौशल्य, आपल्या प्रतिभेची रास्त जाणिव या सा-या गुणवैशिष्ट्यांचं चित्रण करणारा ‘जय हो’ हा अत्यंत आखिव-रेखिव कार्यक्रम प्रेक्षकांच्या चिरकालस्मरणात राहील आणि जेष्ठांना जुन्या आठवणीत नेणारा अविस्मरणीय होता. अडचणींवर मात करून कार्यक्रमाचं यशस्वी तंत्र संयोजन चेतन पंडित, विशाखा बेके यांनी केलं. प्रा.शिरीष अवधानी यांनी कार्यक्रमाचे उत्तम रसग्रहण करून कलापिनीच्या उपक्रमांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.