Pune : लाल महालात सलग 12 तास वारक-यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को- आॅप. बँक तर्फे आयोजन 
 
एमपीसी न्यूज – विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला… ज्ञानोबा माऊली तुकाराम चा अखंड गरज… टाळमृदगांच्या ठेक्यावर विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला वारकरी वर्ग अशा भक्तीमय वातावरणात हरी नामाच्या गजराने लालमहाल दुमदुमुन गेला. सलग १२ तासांच्या या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाईंचे अभंग ऐकताना वारकरी दंग झाले. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरीला निघालेले वारकºयांनी पुण्यामध्ये विसाव्याला असताना नारदीय कीर्तनाचा भक्तीमय आनंद लुटला.   
 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-आॅप. बँक तर्फे वै. ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ भक्ती शक्ती एकात्म नाम सोहळा अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी लालमहालाचे सुरक्षारक्षक परशुराम काशिद, मनोज घोणे यांच्या हस्ते झाले. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर गणेशदादा टोकेकर, सुरेश तरलगट्टी, ज्ञानदेव म्हसणे आदी उपस्थित होते. यावेळी युवा शाहीर होनराज मावळे, डॉ. अजय अपामार्जने, स्वरा अपामार्जने, मुकुंद कोंडे, अ‍ॅड. योगेश देशपांडे, साहिल पुंडलिक, चिन्मय वाईकर यांनी साथसंगत केली. कीर्तनमालेचे हे ५ वे वर्ष आहे. 
 
सकाळी कीर्तनमालेची सुरूवात ह.भ.प.न.चिं.अपामार्जने यांच्या कीर्तनाने सुरूवात झाली. अपामार्जने म्हणाले, संत हे विवेक देणारे आहेत. संतांनी हजारो लोकांपर्यंत समाधान पोहोचविले आहे. खरे समाधानी आणि आनंदी व्हायचे असेल तर वारीमध्ये सहभागी व्हावे. परंतु सगळ््या चिंता विसरून संपूर्ण चित्त हे पांडुरंगाच्या स्मरणात असावे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ह.भ.प.उज्वला वेदपाठक, ह.भ.प. गायत्री देशमुख, ह.भ.प. विकास दिग्रजकर यांचे कीर्तन रंगले. ह.भ.प. मृणाल जोशी, ह.भ.प. मंदार गोखले, ह.भ.प.कृष्णा मालकर, ह.भ.प. प्रा, संगीता मावळे यांच्या कीर्तनाने वारकरी मंत्रमुग्ध झाले. 
 
हेमंतराजे मावळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरला पायी चालत जाण्याची परंपरा वारकरी भक्तांनी अखंड चालू ठेवली आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारकरी भक्तांसाठी सलग १२ तास अखंड नारदीय कीर्तनमालेचे आयोजन केले होते. मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस, सायन्स अ‍ँड कॉमर्सने या उपक्रमात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.