Pune : संतांनी दिली विश्वाचा विचार करण्याची दृष्टी

नाटयसंमेलनाच्या अध्यक्ष किर्ती शिलेदार यांचे मत 
 
आम्ही पुणेकर, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, नोकॉर्ड हेल्थ क्लब, पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेचा अनोखा उपक्रम : वारक-यांसाठी आरोग्य विमा व ई-हेल्थ कार्ड प्रदान सोहळा  
 
एमपीसी न्यूज – सातशे वर्षाची परंपरा असलेला पालखी सोहळा म्हणजेच पंढरीची वारी ही जगामध्ये अद्वितीय आहे. हे केवळ भारताचे नाही तर विश्वाचे प्रातिनिधीक स्वरूप आहे. अवघाची संसार सुखाचा म्हणत ज्ञानोबारायांनी विश्वाचा विचार केला आहे. सगळ््या विश्वाचा विचार करण्याची दृष्टी ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळेच मराठी माणूस हा फक्त स्वत:चा विचार करीत नाही तर तो इतरांचा देखील विचार करतो, असे मत नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष किर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.  

 
कित्येक मैल पंढरीची पायी वारी करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता आम्ही पुणेकर, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, नोकॉर्ड हेल्थ क्लब आणि पिंपरी-चिंचवड ब्लड बँकेतर्फे पत्रकार भवन येथे अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमात वारक-यांना मोफत विमा, ई-हेल्थ कार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, तुकाराम महाराज पालखी सोहळ््याचे प्रमुख सुनील मोरे, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प शिवाजी मोरे, अस्तित्व संस्थेच्या संचालिका कविता कसबे, डॉ. अनुराधा पोतदार, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, डॉ.राजेंद्र खेडेकर, प्रणव पवार, अ‍ॅड. मिलींद पवार, अरविंद जडे, अखिल झांजले, मदन गोकुळ आदी उपस्थित होते. वारक-यांना १ लाख बियांचे वाटपही करण्यात आले.  
 
किर्ती शिलेदार म्हणाल्या, शिस्तीचे भान देणारी, सद्विचारांचे संकीर्तन करणारी, सद्गुण पोहोचविणारी वारी आहे. अशा या वारीमधील संत सज्जनांना वेगळ्याकारे पुणेकर मदत करीत आहेत. ऊन पावसाची तमा न बाळगता टाळ मृदंगाच्या गजरात हरीचे नाम घेत नाचत गात पांडुरंगाच्या भेटीला निघालेले जे वारकरी आहेत त्यांच्यामध्ये पांडुरंगाचाच अवतार दिसतो, असेही त्यांनी सांगितले.  
 
ह.भ.प शिवाजी मोरे म्हणाले, वारकºयांसाठी सुरू केलेल्या हरित वारी अभियानात २२ संस्था सहभागी झाल्या आहेत. देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर हे पालखी महामार्ग हरित करण्याचा संकल्प आहे. पंढरपूरला महाराष्ट्रातून येणारे १४० मार्ग हरित करणे हा महासंकल्प आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हा उद्देश असून वारकºयांच्यासमवेत हा महाराष्ट्र हरित करणार आहे. असेही त्यांनी सांगितले. अजित गोसावी यांनी प्रास्ताविक केले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.