Talegaon Dabhade : भारतीय डिजिटल पार्टी अर्थात #भाडिपाला तळेगावकर रसिकांची उत्स्फूर्त दाद

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील योगिराज फाउंडेशनच्या वतीने योगिराज हॉलमध्ये ग्लॅम अँड ग्लोरी महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या तरुणाईच्या शोमध्ये भारतीय डिजिटल पार्टी अर्थात #भाडिपाला तळेगावकर रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

योगीराज फाउंडेशनच्या पुढाकाराने तळेगावमध्ये नुकतेच भारतीय डिजिटल पार्टीचे अर्थात #भाडिपाचे आगमन झाले. या शोमध्ये ‘भाडिपा’चे सारंग साठे, चेतन मुळे व सुशांत घाडगे यांनी त्यांचा युवकप्रिय टॉक शो सादर केला. युट्यूबवर गाजलेला हा शो पाहण्यासाठी तरुणांबरोबरच ज्येष्ठांनी व प्रौढांनीही गर्दी केली होती.

युवकांची मते आणि मने कशा पद्धतीने मराठी साहित्याचा, सभोवतालच्या परिस्थितीचा आस्वाद घेतात, विचार करतात याचे दर्शन या टॉक शो मधुन घडले. हलके – फुलके विनोद, कोपरखळ्या, मध्येच चावटपणा सामाजिक राजकीय परिस्थितीवर बोचरे पण हसवणारे भाष्य करणारा हा कार्यक्रम तरुणाईची आवाजी दाद मिळवून गेला.

भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर परळचा हिंदमाता विभाग कारण तिथे सर्वात जास्त पाणी साचते किंवा राहुल गांधी हे भारतीय आर्टिस्ट पार्टीचे अखिल भारतीय कॉमेडी आर्टिस्ट आहेत म्हणून त्यांना निवडून दिले तर भाडिपाला सरकारदरबारी स्थान मिळेल ह्या कॉमेंट्सला प्रचंड दाद मिळाली. दुसऱ्या दिवशी नाट्यसंगीताचा बहारदार कार्यक्रम करून योगीराज फाउंडेशनने युवक व ज्येष्ठ या दोन्ही प्रेक्षकांना दोन दिवस मेजवानीच दिली.

भजी महोत्सव, मिसळ महोत्सव, चाट महोत्सव व खान्देश महोत्सव अशा विविध ईव्हेटसचे यशस्वी आयोजन करणाऱ्या आशिष पाठक यांनी तरुणाईचा हा इव्हेंट आयोजित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.