Jadhavwadi : बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्या रवीची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – सुमारे 200 फूट बोअरवेलमध्ये अडकलेला रवी पंडित भिल या सहा वर्षाच्या मुलाची अखेर आज सकाळी सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नानंतर रवीचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

रवी पंडित भिल हा सहा वर्षाचा चिमुकला खेळात असताना 200 फूट खोल असलेल्या उघड्या बोअरवेलमध्ये पडला. ही घटना बुधवारी आंबेगाव तालुक्यातील जाधववाडीजवळील थोरांदळे येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. बोअरवेलशेजारी खड्डा घेऊन मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

संपूर्ण रात्र या मुलाला बाहेर सुखरूप काढण्याचे प्रयत्न सुरु होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुलगा रवी याच्यापर्यंत पोहोचण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले. आज (गुरुवारी) सकाळी रवीला दूध पाजण्यात आले. तो सुटण्यासाठी आर्तपणे साद घालत होता. डॉक्टरांच्या मदतीने त्याची तपासणी करण्यात आली. रवी सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पुन्हा त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्याचा शरीराचा निम्मा भाग पूर्णपणे मोकळा झाला मात्र शरीराचा खालील भाग बोअरवेलमध्ये असलेल्या चिकट माती व पोत्यामध्ये अडकलेला असल्यामुळे त्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरु होते.

अखेर आज सकाळी 9 च्या सुमारास त्याची सुखरूपपणे सुटका करण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले. रवीच्या सुटकेनंतर सर्वानी जल्लोष केला. त्याच्या सुटकेबद्दल परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.