Talegaon Dabhade News : प्रसिद्ध उद्योजक व बांधकाम व्यावसायिक दिलीप पाठक यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध उद्योजक दिलीप पंढरीनाथ पाठक (वय 67) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या मागे पत्नी दीपा, मुलगा कैवल्य तथा आशिष, कन्या गिरीजा, सून, जावई व दोन नातवंडे असा परिवार आहे.

दिलीप पाठक हे स्वतः आर्किटेक्ट होते. तसेच नामवंत बांधकाम व्यावसायिक होते. महाराष्ट्रात सातारा, नाशिक, अलिबाग, गोवा, सोलापूर, नागपूर, मुंबई, शिर्डी, रत्नागिरी, तळेगाव दाभाडे आदी ठिकाणी त्यांनी गृहप्रकल्पांची उभारणी केली होती.

तळेगाव दाभाडे येथील योगीराज फाऊंडेशनचे ते संस्थापक होते. विविध अभिनव उपक्रमांमुळे तळेगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या योगीराज हॉलचे ते मालक होते.

फायब्रोफोम नावाची उद्योगही त्यांनी दीर्घकाळ चालविला. त्या माध्यमातून त्यांनी फायबरच्या प्रचार आणि प्रसाराचे मोठे काम केले. महाराष्ट्रात प्रथमच फायबर ग्लासच्या बोटींचे उत्पादन त्यांनी सुरू केले. राज्यातील बहुतेक सर्व धरणांमध्ये त्यांच्या फायबरच्या बोटी होत्या. कोल्हापूर येथील रंकाळा तलाव तसेच सिद्धेश्वर मंदिर तलावातील पहिली तरंगती कारंजी त्यांनी उभारून दिली.

सातारा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाची बांधणी देखील त्यांनी केली होती. त्या तलावात काही आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा देखील झाल्या.

फायबरच्या रेखीव व सर्वांगसुंदर मूर्ती घडविण्यात दिलीप पाठक यांचा हातखंडा होता. पाटण, उंब्रज, पुण्यात वाकडेवााडी, तळेगाव दाभाडे येथे त्यांनी घडविलेल्या गणेशमूर्ती आजही भाविकांच्या श्रद्धास्थानी आहेत. सातारा येथील नटराज मंदिराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.

 सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळातर्फे शिवथरघळ येथील सुंदरमठ सेवा समितीचे कार्यकारिणी सदस्य तसेच योगीराज हॉलचे संचालक व योगीराज फाऊंडेशनचे प्रमुख कैवल्य तथा आशिष पाठक यांचे ते वडील होत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे ते भाचे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.