Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे वतीने यावर्षी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 14 मे रोजी सायंकाळी 6.11 वाजता तळेगाव दाभाडे ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर प्रांगणात संपन्न होणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष रो. आनंद आस्वले व प्रकल्प प्रमुख अनिश होले यांनी दिली.

 

सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 23 वे वर्ष आहे. अखंडपणे हा उपक्रम चालवणाऱ्या या एकमेव संस्थेची लिमका बुक ऑफ
रेकाॅर्डमध्ये नोंदणी झालेली आहे.पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे, उध्दव चितळे, विलास जाधव व मंगेश गारोळे उपस्थित होते.

 

यावर्षी अंदाजे 25 जोडपी या विवाह सोहळ्यात सहभागी होतील. सहभागी जोडप्यास संसार उपयोगी 32 भांड्यांचा संच, शेगडीसह गॅस संच, वधूवरांचे लग्न पोशाख,मोफत देण्यात येणार आहे.  व-हाडी लोकांसाठी नाष्टा व मिष्टान्न भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.  साखरपुडा,  हळदी,  वाजंत्री,  वधू वरांची बॅंड व ढोल ताशांचे गजरात भव्य मिरवणूक, भव्य मंडप ही सर्व व्यवस्था संयोजक रोटरी क्लबकडून होणार आहे.

 

शिवाय यावर्षी प्रथमच लग्न सोहळ्यास येणाऱ्यांसाठी जहांगिर हाॅस्पिटल पुणे यांचेवतीने मोफत रक्त तपासणी, शुगर व हिमोग्लोबिन तपासणी आणि हाडांची घनता तपासणी होणार आहे. वह्राडी मंडळींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबकडून करण्यात आले आहे.

 

तसेच वधू वरांसाठी एक मोफत हेल्थ पॅकेज  (पूर्ण तपासणीचे) जाहिर करण्यात आले आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 10 मे पर्यंत नोंदणी करता येईल. त्यासाठी 9323836090, 8007676766, 9922924941 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.