Talegaon : किशोर आवारे यांच्या हत्येचा घटनाक्रम

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) भरदिवसा हत्या करण्यात आली. (Talegaon) प्राथमिक चौकशीत सहा जणांनी मिळून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी किशोर आवरे यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच पिस्तुलातून गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर घडली.

 

किशोर आवारे यांच्या हत्येचा घटनाक्रम

 

शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास किशोर आवारे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले.

 

दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास किशोर आवारे मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आले.

 

त्याचवेळी नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

 

त्यातील काही आरोपींनी पिस्तुलातून किशोर आवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.

 

किशोर आवारे रक्ताच्या थारोळ्यात नगरपरिषद कार्यालयासमोर पडले. त्यानंतर आरोपी काही क्षण घटनास्थळी थांबून राहिले.

 

त्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपी तळेगावातील गावठाणाच्या दिशेने पळून गेले. रस्त्यात आरोपींनी दोन दुचाकीस्वारांना पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकी जबरदस्तीने चोरल्या.

 

किशोर आवारे यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला देखील पिस्तुलाचा धाक दाखवला.

 

किशोर आवारे यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

 

किशोर आवारे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 

दरम्यान घटनास्थळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, श्रीकांत डिसले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.

 

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार करत आरोपींच्या शोधात ती पथके रवाना केली.

 

शुक्रवारी सायंकाळपर्यंत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.