Pimpri News : सावित्रीबाई फुले अकादमी च्या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल लागल्यावर प्रशिक्षण वर्ग सुरु होणार

एमपीसी न्यूज : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या गरजू, होतकरू आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार व्हावे तसेच भारतीय प्रशासकीय सेवा,भारतीय पोलीस सेवा आणि इतर संलग्न स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने (Pimpri News) पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ‘सावित्रीबाई फुले अकादमी’ हे प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार असून अल्पावधीतच या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग सुरु होतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले अकादमीचे संचालक अशोक कोल्हे यांनी दिली.

या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सामायिक एकत्र प्रवेश पात्रता परीक्षा दि. 4 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली होती. सध्या महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत. याचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. गरजू, होतकरू आणि कष्टकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता, गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे सामर्थ्य असूनही काही अडचणींमुळे अनेक विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यापासून वंचित राहतात.

अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळविण्याच्या प्रयत्नांना बळ देता यावे आणि स्पर्धा परीक्षांद्वारे त्यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जावे यासाठी ठाणे महानगरपालिका संचालित, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.

Pimpri News : पिंपरी येथे भरणार एक दिवसीय कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर व सेन्ह मेळावा

या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक विविध विषयांबाबत तज्ञांचे मार्गदर्शन करण्याची सोय उपलब्ध असणार आहे. शिवाय आवश्यक पुस्तके देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा घेण्यात येणार असून सर्व सराव परीक्षांचे अनुभवी व तज्ञ प्रशिक्षकांकडून नियमितपणे मुल्यमापन करण्यात येणार आहे.(Pimpri News ) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी तसेच तज्ञ परीक्षकांद्वारे प्रतिरूप मुलाखत आणि व्यक्तीशः मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मार्गदर्शनाकरिता युपीएससी अभ्यासक्रमातील अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या ठिकाणी 120 विद्यार्थी क्षमतेचा वातानुकुलित अभ्यासिका हॉल, सर्व उपयुक्त पुस्तके, मासिकांसहित 30 विद्यार्थी क्षमता असलेले भव्य ग्रंथालय, 120 विद्यार्थी क्षमता असलेले भव्य व्याख्यान वर्ग व सभागृह विद्यार्थ्यांच्या गट चर्चा या उपक्रमाकरिता विशेष जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीकरिता आवश्यक असणारे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचे विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी नागरी सेवेतील कार्यरत किंवा निवृत आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेच क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन व्याख्यानांचे आयोजन करण्याचे नियोजित आहे.

नागरी सेवेतील कामकाजाची खरी ओळख होण्याकरिता सर्व प्रमुख शासकीय कार्यालये यांना क्षेत्रीय भेट देण्याबाबतच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी या विषयाकरिता विशेष सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 50 विद्यार्थी आणि यशदाचे 70 विद्यार्थी असे एकूण 120 विद्यार्थी एकाचवेळी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. असे अकादमीचे संचालक अशोक कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.