Pimpri News : यंदा पवनाथडी जत्रेत विविध खाद्यसंस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाचीही मेजवानी

एमपीसी न्यूज :  महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.मैदानावर दि 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. (Pimpri News) यंदा पवनाथडी जत्रेत गरिकांना विविध खाद्यसंस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाचीही मेजवानी मिळणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून या जत्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

जत्रेच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध भागातील पारंपरिक लोककलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक लोककलांचे सादरीकरण लोककलाकार याठिकाणी करतील. लहान मुलांना विविध आकर्षक व मनोरंजक खेळ खेळण्याची व अनुभवण्याची संधी जत्रेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना विविध खाद्यसंस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाचीही मेजवानी मिळणार आहे.

पवनाथडी जत्रेत वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे अर्ज सादर केले असून सुमारे आठशे बचत गटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. मर्यादेपेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत पद्धतीने स्टॉल्सचे वाटप करण्यात येणार आहे. यंदा दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने सन 2007 – 08 या आर्थिक वर्षापासून पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी अशाप्रकारे पवनाथडी जत्रा भरवण्यात आली. मात्र, कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले नाही. यावर्षी दि. 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.मैदानावर पवनाथडी जत्रा भरवण्यात येणार आहे.

Pimpri News : सावित्रीबाई फुले अकादमी च्या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल लागल्यावर प्रशिक्षण वर्ग सुरु होणार

महिला बचत गट आणि वैयक्तिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी माध्यम ठरले आहे. यामध्ये महिला बचत गटांसाठी विक्री प्रदर्शनासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतात. (Pimpri News) सन 2007 मध्ये या स्टॉल्सची संख्या सुमारे तीनशे होती. यावर्षी महापालिकेच्या वतीने सुमारे चारशे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टॉलमध्ये दोन बचत गटांना विक्री प्रदर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुमारे आठशे बचत गटांना स्टॉल्स उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी स्टॉल्स राखीव ठेवण्यात येणार आहेत. जत्रेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला बचत गटांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्टॉल्स मध्ये विविध उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शने मांडण्यात आहेत. सुरुवातीला 25 लाख रुपये आर्थिक उलाढाल असलेल्या या जत्रेची उलाढाल सुमारे 2 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी दिली.

पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने विविध शहरातून तसेच महापालिकांमधून समित्या, अनेक मान्यवर जत्रेस भेट देत असतात. तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, राजकीय नेतेमंडळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील जत्रेत सहभागी होतात. सलग पाच दिवस चालणा-या या जत्रेमध्ये सुमारे तीन ते पाच लाख लोक भेट देतील असा अंदाज असून दररोज 70 हजार ते 1 लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. (Pimpri News) त्याअनुषंगाने येणाऱ्या नागरीकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी सुरु असून त्याबाबत महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना विविध जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत, अशी माहिती समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.