Pimpri : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवारी) उत्साहात साजरी करण्यात आली. नमाजपठण झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत मुस्लिम बांधवानी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

मंगळवारी संध्याकाळी स्पष्टपणे चंद्र दर्शन झाल्याने आज बुधवारी शहरामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी, नेहरुनगर येथील मस्जिदमध्ये नमाज पठण झाले. त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील सर्व मशीदींवर रोषणाई करण्यात आली असून मुस्लिम धर्मियांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

सकाळी लहान थोरांनी नवीन कपडे परिधान करुन मस्जिद, तसेच ईदगाह मैदान, मदरसा येथे सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत नमाज पठण केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील नमाज पठण झाल्यानंतर राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. यामुळे बुधवारी रमजानच्या दिवशी मुस्लिम बांधव आनंदित झाले होते. तर, फितर म्हणजे दान करणे अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येत असल्याने या सणाचा आनंद मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.