Pimpri : नवे संरक्षणमंत्री रेडझोनचा प्रश्न मार्गी लावणार का ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भातील रेडझोनचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पाच ते सात संरक्षण मंत्र्यांनी शहरातील रेडझोनचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रश्न जैसे थे आहे. आता देशाचे नवे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावणार का ? अशा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीतील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर, निगडी-प्राधिकरण, किवळे, देहूरोड, मामुर्डी, शेलारवाडी, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, बोडकेवाडी, माळवाडी (देहू), देहूगाव, विठ्ठलवाडी आदी परिसरातील नागरिकांना या रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे विकासकामे करण्यास देखील अडचण येत आहे. त्यामुळे संरक्षण खात्याने रेडझोन क्षेत्र हटवावे या मागणीसाठी रेडझोन संघर्ष समितीने वारंवार आंदोलन केले. प्रत्यकवेळी आश्वासन मिळाले. परंतु, प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.

तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार, ए. के. अँटोनी, मनोहर पर्रीकर , निर्मला सितारमण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकडे रेडझोन संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. दिवंगत सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी तळवडे परिसरात प्रचारासाठी आले होते. त्यांनी देखील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

पर्रीकर यांच्या माध्यमातून प्रश्न सुटण्याची शहरवासियांना अपेक्षा होती. त्यांनी रेडझोनचा प्रश्न समजावून घेतला होता. शरद पवार यांच्यानंतर मराठी बोलणारे दुसरे संरक्षणमंत्री झाले होते. त्यामुळे प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. तर, संरक्षण राज्यमंत्री भामरे देखील मराठी होते. गोव्यातील राजकीय तिढ्यानंतर पर्रीकर यांना पुन्हा गोव्यात परतावे लागले होते. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले.

रेडझोन संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी आजपर्यंत संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. प्रत्येकवेळी मंत्र्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. नेते बदलले, मंत्री बदलले पण रेडझोनचा प्रश्न तो प्रश्नच राहिला. केंद्रातील मोदी सरकार यांच्या दुस-या टर्ममध्ये उत्तरप्रदेशचे राजनाथ सिंह यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची धुरा आहे. आता राजनाथ सिंह हे पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावणार का? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.