Nigdi : पोलिसात तक्रार दिल्यावरून मायलेकीवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – एका तरुणीने पोलिसात तक्रार दिली. या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने तक्रारदार तरुणी आणि तिच्या आईवर खुनी हल्ला केला. दोघींना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी (दि. 20) सायंकाळी सातच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडली.

अनिता नवनाथ गायकवाड (वय 50, रा. ओटास्कीम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कैलास विटकर, अनिल शिंदे, अरुण जाधव, अजय शिंदे, सुनीता शिंदे, शीतल विटकर, सीमा बेलसरे, रेखा कांबळे, राणी कांबळे इत्यादी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलीने आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्याचा राग मनात धरून सर्व आरोपी फिर्यादी महिला आणि तिची मुलगी घरात असताना त्यांच्या घरात घुसले. मुलीने तक्रार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी दोघींना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच सर्वांनी मिळून दोघींना लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली. या भांडणात आरोपींनी फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलीच्या अंगावरील कपडे फाडले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.